कोल्हापूर : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाल्याने बाजार फुलला आहे. आवक वाढल्याने दर घसरल्याने बाजारात स्वस्ताईचा माहौल आहे; पण याच वेळी रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर मात्र गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडण्याची वेळ आली आहे.
शेंगतेल प्रतिकिलो दीडशेकडे कूच करीत असून सरकी, सूर्यफूल या तेलांनीदेखील शंभरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे तिळाचे पीक वाया गेल्याचा परिणाम बाजारात दिसत असून, ऐन संक्रांतीला तिळाचा गोडवा महागाईने कडवटपणात बदलला आहे. १०० रुपये किलो असणारा तीळ आता १५० च्याही वर गेला आहे. गूळही ५० ते ५५ रुपयांवर गेला आहे.रविवारी लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात फेरफटका मारला असता हरतऱ्हेच्या भाज्या आणि फळांनी बाजार ओसंडून गच्च भरल्यासारखी परिस्थिती आहे. गवारी आणि भेंडीचे दर केवळ ५० ते ६० रुपये किलो आहेत; अन्यथा सर्वच फळभाज्या २० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहेत.
कोबी आणि फ्लॉवरची आवक प्रचंड झाल्याने दरही १० ते १५ रुपये गड्डा असा झाला आहे. काकडी आणि गाजरांचे ढीग वाढू लागले आहेत. त्यांचा दरही २० ते ४० रुपये किलो आहे. कोथिंबिरीसह पालेभाज्या १० रुपयांना जुडी असा दर आहे.लहान-मोठ्या आकारांचे तिळगूळ १०० रुपये, तीळवडी व रेवड्या २०० रुपये किलो असा दर झाला आहे. पूजनासाठी लागणारी सुगडीही ५० रुपयांना अर्धा डझन आहेत.
नवीन कांदा-बटाट्याची आवक वाढलीबाजारात नवीन कांदा व बटाट्यांची आवक वाढली आहे. जुना कांदा व बटाटा ४०, तर नवीन ३० रुपये किलो असा दर आहे. आलेही ८० ते ९० रुपये किलोवर आले आहे. लसूण अजूनही १५० रुपयांवर स्थिर आहे. टोमॅटोचे दर १५ रुपये किलो झाले आहेत.संक्रांतीला प्रामुख्याने लागणारा आणि फक्त हिवाळ्यातच खायला मिळणारा ओला हरभरा बाजारात आला आहे. १० रुपयांना दोन डहाळे असा दर आहे.डाळिंबांचे दर घसरलेबाजारात सांगोल्याहून येणारे अॅपल बोर आणि गणेश डाळिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. २० रुपये किलो असा दर आहे. याशिवाय संत्र्यासारख्या दिसणाऱ्या माल्टाचीही आवक मोठी आहे. ४० ते ५० रुपये असा किलोचा दर आहे.बाजारात सहसा दृष्टीस न पडणारे अंजीर आता मात्र मुबलक प्रमाणात दिसत असल्याने दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. ५० ते ६० रुपये असा किलोचा दर आहे. पपई १० रुपयांना एक नग आहे. सफरचंद ८० ते १२० रुपये किलो आहेत. द्राक्षांचे दरही कमी होऊ लागले आहेत. ५० रुपयांना अर्धा किलो असा दर आहे.डाळींचे दरतूर ९६, उडीद १२०, मसूर ७०, हरभरा ७०, मूग ९६, मसूरा ७०, चवळी ८०, हरभरा ८०, मटकी १२०, मूग ८४ रु. प्रतिकिलो. दर आहेत.