कोल्हापूर : आढाववाडी (ता. पन्हाळा) येथील विवाहितेच्या विनयभंगाचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने कळे न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश मिलिंद तोडकर यांनी आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील (वय २५) याला दोन वर्षांची शिक्षा व पीडित महिलेला तीन हजार रुपये दंडाची रक्कम देण्याचे आदेश मंगळवारी दिले.
या खटल्याचे दोषारोपपत्र बारा तासांत दाखल केले. त्यावर न्यायालयाने अकरा दिवसांत आरोपीला शिक्षा दिली. अत्यंत कमी दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण करून आरोपीला शिक्षा देण्याची ही राज्यातील पहिली घटना आहे.
अधिक माहिती अशी, आढाववाडी येथील १९ वर्षांची विवाहित महिला दि. ८ सप्टेंबर रोजी पतीला फोन करण्यासाठी राहत्या घराशेजारच्या शेतात गेली असता गावातील प्रकाश पाटील याने तिचा हात पकडून विनयभंग केला. त्यावेळी पीडित महिलेने आरडाओरड केली असता पाटील हा उसाच्या शेतामध्ये पळून गेला. महिलेने घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला. त्यांनी तिला धीर देत कळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच संशयित शेतवडीत लपल्याचे पोलिसांना सांगितले. कळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश देसाई यांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन साक्षीदार मिळविले. पंचनामा व इतर तपास पूर्ण केला. शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तपासाची माहिती घेत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या बारा तासांत आरोपीविरोधात कळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीस कळे न्यायालयात तत्काळ सुरुवात झाली. आरोपी पाटील याच्याविरोधात लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गुन्हा कबूल न केल्याने तपासी अंमलदार इरफान गडकरी, पीडित फिर्यादी, पंचनामा व चार साक्षीदार तपासले. परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारावर न्यायाधीश तोडकर यांनी आरोपी पाटील याला दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विनयभंगाच्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र अवघ्या बारा तासांत दाखल करून त्यावर अकरा दिवसांत सुनावणी होऊन आरोपीला शिक्षा होते, हे महाराष्टÑातील पहिले उदाहरण आहे. जलदगती खटला निकाली काढून आरोपीला शिक्षा लागल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे.-----------------------------फोटो : १९०९२०१७-कोल-प्रकाश पाटील (आरोपी)