यड्राव : जिल्ह्यातील किती शाळा प्रत्यक्षात डिजिटल बनल्या आहेत, कोणकोणती साधने मिळाली आहेत, कोणत्या निधीतून ते साहित्य मिळाले, शाळा डिजिटलसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांनी केली आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळण्याची प्रत्यक्ष संधी निर्माण झाली आहे.
‘लोकमत’मध्ये ‘विद्यार्थी डिजिटल शाळेच्या प्रतीक्षेत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते.जिल्ह्यातील शाळांकडून शिक्षणाधिकाºयांनी मागवून घेतलेल्या माहितीमध्ये, शाळा डिजिटल आहे का? शाळेतील डिजिटल वर्गाची संख्या किती? डिजिटल स्कूलअंतर्गत एलईडी टीव्ही, एलएफडी टीव्ही, स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, टॅब यापैकी कोणकोणती साधने आहेत? शाळेत संगणक लॅब आहे का? ई-लर्निंग सॉफ्टवेअर अद्ययावत आहे का? डिजिटल साहित्य लोकसहभाग, १४ वा वित्त आयोग, जि. प. स्व निधी आमदार-खासदार यांच्या निधीतून का अन्य कोणत्या मार्गाने मिळाला, याबाबतची सविस्तर व तपशिलवार माहिती मागवून घेतली आहे. त्याचबरोबर शाळा डिजिटल नसेल, तर कोणते प्रयत्न सुरू आहेत, याबाबतचीही माहिती मागवून घेतली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, याकरिता शासनाकडून ‘डिजिटल शाळा’ हा उपक्रम राबविण्यात आला; परंतु शासनाचा निधी व राजकीय मंडळींची आधुनिक शिक्षणाबाबतची अनास्था यामुळे अशा निधीची पुरेपूर अंमलबजावणी न होताच पूर्णत्वासाठी कागदपत्रे पूर्ण करण्याची सक्ती शाळांना होत असल्याने ग्रामीण विद्यार्थी डिजिटल शाळांच्या प्रतीक्षेत आहेत.‘लोकमत’च्या वृत्तामुळे शिक्षण विभाग जागृत झाल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती घेतली आहे. याची अंमलबजावणी झाल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे. यासाठी शासकीय अधिकाºयांच्या सकारात्मक दृष्टिकोनाची गरज आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पटसंख्या वीसहून अधिक असलेल्या १५८१ शाळा आहेत. त्यापैकी १३८९ शाळा डिजिटल झाल्याची माहिती शाळांकडून आलेल्या अहवालानुसार मिळालेली आहे. शाळांमध्ये डिजिटलचे साहित्य असल्याबाबत खातरजमा करण्यात येणार आहे. जानेवारीअखेर संपूर्ण जिल्ह्यातील शाळा डिजिटल करणार असल्याची माहिती दिली.-सुभाष चौगुले,प्राथमिक शिक्षणाधिकारी--