कोल्हापूर : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेसाठी दिलेले आव्हान शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने स्विकारले आहे. समितीने बुधवारी (दि.३०) सायंकाळी साडे पाच वाजता बिंदू चौकात चर्चेसाठी यावे असे आवाहन केले आहे. याबाबतचे स्मरणपत्र मेलद्वारे मंत्री तावडे यांना पाठविण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे समन्वयक अशोक पोवार व रमेश मोरे यांनी शनिवारी दिली आहे.पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण मंत्री तावडे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यभर शिक्षणाच्या कंपनीकरणाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाबाबत कोल्हापूरातील लोक चुकीची माहिती देत आहेत. हे लोक डाव्या विचाराचे असून त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचीही दिशाभूल केली आहे.
शिक्षण वाचवा नागरी कृती समिती व त्यांच्या नेत्यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी बिंदू चौकात यावे असे जाहीर आव्हान मंत्री तावडे यांनी यावेळी दिले होते. यावर समिती व प्रा. एन. डी. पाटील यांनी आव्हान स्विकारत चर्चेसाठी केव्हाही व कोठेही येण्यास तयार असल्याचे सांगून शिक्षण मंत्र्यांनी वेळ व तारीख सांगावी असे मेलद्वारे कळविले होते.
परंतु दहा दिवस झाले तरी मंत्र्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. त्यामुळे समितीने पुन्हा मेलद्वारे चर्चेला येण्यासाठी स्मरणपत्र पाठविले आहे. यामध्ये बुधवारी (दि.३०) सायंकाळी ५.३० वाजता चर्चेसाठी बिंदू चौकात येण्याचे आवाहन केले आहे. आम्ही स्वागतास व पाहुणचारास सज्ज असल्याचेही या स्मरणपत्रात म्हंटले आहे.