गडहिंग्लज : वीस पटाखालील शाळा बंदचा निर्णय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महिन्याच्या आत मागे घ्यावा, अन्यथा त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा माजी सभापती अमर चव्हाण यांनी दिला.
सरकारी प्राथमिक शाळा बचाव समिती व डी.एड्.बी.एड्. बेरोजगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रांतकचेरीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. लक्ष्मी चौकातून सुरू झालेल्या मोर्चाची सांगता प्रांतकचेरीच्या आवारात झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.
जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक म्हणाले, २० पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाचाच असतानाही शिक्षणमंत्री दुटप्पी भूमिका घेत आहेत. संबंधित अध्यादेश मागे न घेतलेस राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे म्हणाले, सरकारी शाळा वाचविण्यासाठी जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, गोरगरीबांच्या शाळांसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. काँग्रेसचे दिग्विजय कुराडे म्हणाले, विशिष्ट विचारसरणीचे शिक्षक नेमण्यासाठीच शिक्षक भरती बंद आहे. सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचाच हा डाव हाणून पाडला पाहिजे.
याप्रसंगी बसवराज आजरी, संतोष चिक्कोडे, सचिन देसाई, सुरेश थरकार, बाळासाहेब मोर्ती, रवींद्र यरकदावर यांचीही भाषणे झाली. मोर्चात मधुकर येसणे, सुभाष निकम, आण्णासाहेब शिरगावे, प्रशांत देसाई, संजय चाळक, अजित बंदी,अश्विन यादव, बसवराज आरबोळे, संजय सुतार, उज्वला दळवी, गीता पाटील, आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.निवेदनातील मागण्या :
शिक्षणाचे खाजगीकरण थांबवा, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, डी.एड्., बी.एड्. बेरोजगारांना सेवेत सामावून घ्या, कंत्राटी शिक्षक भरती नको, शिक्षकांच्या रिक्त जागा त्वरीत भरा.
यांनीही दिला पाठिंबा
गडहिंग्लज तालुका सरपंच संघटना आणि सखी महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही मोर्चात सहभागी होवून आंदोलनाला पाठिंबा दिला.
शेतमजूर महिलेचा इशारा
मराठी शाळा बंद केल्या तर गरीब मुलं कुठे जातील. आई-बाप नसलेल्या मुलांनी कसं शिकायचं? आमची मागणी मान्य झाल्याशिवाय इथून हलणार नाही ? या शब्दांत खणदाळच्या सुनंदा धनवडे या शेतमजूर महिलेने आपली संतप्त भावना व्यक्त केली.