समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वयाची ४० वर्षे पूर्ण केलेल्या शहरातील १० जणांना ‘तुमचे माध्यमिक शिक्षण कु ठे झाले?’ अशी विचारणा केली तर त्यांतील किमान पाचजण ‘आम्ही प्रायव्हेट हायस्कूलला शिकलो,’ असे अभिमानाने सांगतील. खासबागेतील हे प्रायव्हेट हायस्कूल म्हणजे दर्जेदार शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृतीला पाठबळ देणारे एक शैक्षणिक संकुल आहे. आज देशविदेशांमध्ये या शाळेचे अनेक विद्यार्थी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.रामचंद्र नरसिंह कुलकर्णी ऊर्फ विभूते गुरुजी यांच्यासह त्यांच्या काही मित्रांनी लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या प्रेरणेतून ११ जून १८८३ रोजी प्रायव्हेट इंग्लिश स्कूलची स्थापना केली. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पावधीतच शाळेला रामराम ठोकला. त्यामुळे १८८६ पासून शाळा चालविण्याची जबाबदारी विभूते गुरुजींवरच पडली. त्यांना गुरुवर्य कै. अ. वि. जोशी यांचेही सहकार्य मिळाले. पहिल्या तीनच इयत्ता आणि विद्यार्थिसंख्या पाच असताना शाळेला सुरुवात झाली आणि १८८७ मध्ये शाळेला पूर्ण हायस्कूलचा दर्जा मिळाला. कै. विभूते गुरुजींनी एक ध्येय म्हणून सलग ३६ वर्षे ही शाळा चालविली आणि नावारूपाला आणली. या दरम्यान राजर्षी शाहू महाराज आणि पुढे छत्रपती राजाराम महाराज यांनी संस्थेला अनुदान दिले. पुढे या शाळेचे खासगी स्वरूप बदलण्यात आले आणि ३१ आॅगस्ट १९१९ या दिवशी ‘प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. शाळा जरी आधी सुरू झाली असली तरी संस्था नंतर स्थापन करण्यात आली. यंदा संस्थेचे शतकमहोत्सवी वर्ष सुरू आहे.ही शाळा १९५२ पर्यंत भाड्याच्या जागेत भरत होती. २१ फेबु्रवारी १९४१ रोजी ज्या इमारतीत शाळा भरत होती, त्या राजोपाध्ये वाड्यास अचानक आग लागली. यातूनही संस्था सावरली. अनेक अभ्यासू, गुणवान शिक्षक ज्ञानदानाचे झपाटून काम करीत होते. कै. श्रीमंत माधवराव ऊर्फ बाळासाहेब पंत अमात्य, कै. भाऊसाहेब पंत अमात्य, कै. बाबासाहेब पंतप्रतिनिधी विशाळगडकर, पद्मश्री देवचंद शाह, कै. अॅड. एस. आर. पोतनीस, भैयासाहेब बावडेकर या मान्यवरांनी संस्थेच्या अध्यक्षपदाच्या काळात संस्थेच्या प्रगतीसाठी काम केले. विद्यार्थिसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने राजोपाध्ये वाडा आणि पंगू वाडा या दोन ठिकाणी शाळा भरू लागली. डॉ. जे. पी. नाईक यांनी इतर शाळांप्रमाणे प्रायव्हेट हायस्कूलच्या बांधकामासाठी खासबागेतील सव्वा दोन एकर जागा दिली. शाळेचे माजी विद्यार्थी, सिनेदिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी ११ एप्रिल १९५७ रोजी शाळेला भेट दिली. अपुरी इमारत पाहिल्यानंतर त्यांना खंत वाटल. त्यांनी सहकार्य केले आणि इमारतीचा दुसरा मजला बांधून झाला. तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष पद्मभूषण देवचंद शाह यांचे याकामी सहकार्य लाभले. विभूते गुरुजी आणि अ. वि. जोशी यांच्या या संस्थेमधील अतुलनीय योगदानाबद्दल या दोघांचेही पुतळे संस्था प्रांगणामध्ये उभारले आहेत.अमृतमहोत्सवानिमित्त आॅक्टोबर १९६० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत संस्थेचा कार्यक्रम घेतला. सर्व क्षेत्रांमध्ये प्रायव्हेट हायस्कूलचा दबदबा असल्याचे सध्या पाहावयास मिळते. अगदी संस्कृत एकांकिकांपासून ते फुटबॉलपर्यंत आणि एनसीसीपासून ते शाहू जयंतीच्या चित्ररथापर्यंत अनेक बाबतींत प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी अग्रेसर आहे. आजही प्रायव्हेट हायस्कूलमधील शिकून आजोबा झालेले अनेकजण नातवंडांसाठी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचा आग्रह धरतात यामध्येच या संस्थेचे यश सामावले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेचा मानदंड ‘प्रायव्हेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:36 AM