कोल्हापूर : दिव्यांगांना बळ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे महत्वाचे आहे. यासाठी शासनाने त्यांच्यासाठी सुरु केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केले.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या ‘एल्मिको’च्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत देशातील ५ लाख १० हजार दिव्यांगांना ४१८ कोटी रुपये खर्चून साहित्य वितरित करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रतनलाल कटारिया यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या साहित्य वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होते.
कटारिया म्हणाले, कोल्हापुरातील हे ५७६ वे शिबिर असून यापुढच्या काळात दिव्यांगांना उत्तम दर्जाचे साहित्य देण्यासाठी ‘एल्मिको’ने जर्मनीतील आॅटोबॉक, इंग्लंडमधील मोटिवेशन ट्रस्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबतही सामंजस्य करार केले आहेत.कोल्हापूर जिल्हा परिषदेचा गौरव करून कटारिया म्हणाले, आज या शिबिरामध्ये १० कोटी रुपये खर्च करून १५ हजार ६९५ दिव्यांगांना २३ हजार ४९५ साधने वितरित करण्यात आली आहेत. आपल्याकडे असलेल्या जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशातील १५ कोटी घरांना ३ लाख ६० हजार कोटी रुपये खर्च करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.रामदास आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागाला ८५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यातील ९५० कोटी रुपये दिव्यांगांसाठी खर्च करण्यात येत आहेत. खासदार धैर्यशील माने, जि. प. अध्यक्ष बजरंग पाटील यांची यावेळी भाषणे झाली.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांनी आभार मानले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सभापती प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.‘लोकमत’चा उल्लेखखासदार संजय मंडलिक यांनी या दिव्यांगांचे साहित्य पडून असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आपण केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा कार्यक्रम निश्चित झाल्याचे सांगितले. यापुढच्या काळात वेळेत कार्यक्रम व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.