पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील तीन गावांना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून, प्रामुख्याने शाहूकालीन हत्ती पैदास केंद्र असलेल्या पन्हाळा वनविभागातील मानवाड येथे हत्ती पैदास केंद्र पुन्हा सुरू करता येते का, याची माहिती घेत असल्याचे वनअधिकारी प्रियांका दळवी यांनी सांगितले. राज्य वन्यजीव मंडळाच्या १६ व्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, कोल्हापूरमधील अन्य तालुक्यांबरोबरच पन्हाळा तालुक्यातील पश्चिमेकडील मानवाड, कोलीक, वाशी येथील वनक्षेत्रांना राखीव वनक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. या प्रस्तावाला त्या परिसरातील राखीव वनक्षेत्राचा समावेश करण्यात आल्याची माहिती पन्हाळा वनअधिकारी प्रियांका दळवी यांनी दिली. राखीव वनक्षेत्रामधील मानवाड, वाशी, कोलीक या जागा वन कायद्याअंतर्गत संरक्षित होणार आहेत. पन्हाळा वन विभागातील मानवाड या गावातील वनहद्दीत शाहूकालीन हत्ती पैदास केंद्र होते ते पुन्हा सुरू करता येते का याची माहिती घेतली जात असून, हे यशस्वी झाल्यास सह्याद्रीच्या डोंगररांगेतील हे पुन्हा आश्चर्य ठरणार आहे. राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण या ठिकाणी मिळणार असून, या ठिकाणच्या पारंपरिक वृक्षसंपदेतील दुर्मीळ वृक्षांचे संगोपन होणार आहे. यात मोडी, अडका, खुरी, कुंभळ, अंजन ही झाडे आहेत. तेथील स्थानिकांचे हक्क अबाधित राहणार असून वन्यजीव भ्रमणमार्ग आजरा, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, पेंडाखळे, मलकापूर, शिराळा असा सहा तालुक्यांतील डोंगररांगेतील घनदाट जंगलाचा राहणार आहे. यात प्रामुख्याने हत्ती, गवा, बिबट्या, वाघ या प्राण्यांचा समावेश आहे. घोषित झालेल्या राखीव जंगलाचा ताबा सध्या वनविभागाकडेच राहणार असून, वन्यजीव प्रकल्प कार्यान्वित होईल. त्यावेळेस हस्तांतर होणार आहे.
शाहूकालीन हत्ती पैदास केंद्र वनविभाग पुन्हा चालू करण्याच्या प्रयत्नात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:48 AM