कोल्हापूर : रस्ते वाहतुकीच्या समस्या जटिल होत असून, त्या कमी करण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांतून विशेष प्रयत्न व्हावेत, असे प्रतिपादन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले. संवेदना फौंडेशनतर्फे प्रकाशित केलेल्या रस्ते वाहतूक सुरक्षेविषयी जनजागृती पत्रकाचे प्रकाशन आमदार जाधव यांच्या हस्ते दसरा चौकात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. संवेदना फौंडेशनच्या कामाचे कौतुक करीत शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी उभी राहावी यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असेही ते म्हणाले.
स्वयंशिस्त, कायद्याचे पालन आणि इतरांचा विचार या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित होईल व अपघातविरहित समाजाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन संवेदना फौंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी केले.
याप्रसंगी शहर वाहतूक पोलीस अधीक्षक स्नेहा गिरी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक अनिल गुजर, संवेदना फौंडेशनचे अध्यक्ष संजय कात्रे, सचिव डॉ. ऋषिकेश जाधव, ट्रेझरर सुहास नाईक, प्रसाद चौकले, अशोक चौगुले, हरिश्चंद्र धोत्रे, महादेव इंगवले आणि संपूर्ण संवेदना, टीम आदी उपस्थित होते. अध्यक्ष संजय कात्रे यांनी आभार मानले.