कोल्हापूर : विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ देऊन विद्यमान पदाधिकाऱ्यांचे मुदतवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या इच्छुक सदस्यांनी सोमवारी केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील आमचे नेते आहेत. त्यांनी पदाधिकारी बदलाचा शब्द पाळावा अशी अपेक्षा या सदस्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी मनीषा कुरणे वगळता सर्व महिला सदस्यांचे पती उपस्थित होते.
याबाबत शिंगणापूरचे अमर पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी आम्ही सर्वांनी नेत्यांना साथ दिली. आम्ही त्यांच्याशी निष्ठा ठेवून आहोत. गाेकुळ व अन्य संस्थांचा संदर्भ देऊन विद्यमान पदाधिकारी मुदतवाढ मिळविण्यासाठी वातावरण निर्मिती करीत आहेत. त्यांनी नेत्यांकडे निवडीवेळीच राजीनामे दिले आहेत. आम्ही दोन, तीन वेळा नेत्यांना भेटलो आहोत. त्यांनी बदल करण्याचा शब्द दिला आहे. तो त्यांनी पाळावा अशी आमची इच्छा आहे.
जीवन पाटील म्हणाले, भाजपच्या वेळी जसे झाले तसे यावेळीही होऊ नये. पांडुरंग भांदिगरे म्हणाले, योग्य वेळ आल्यावर बदल करतो असे सांगितले आहे. आता हीच वेळ योग्य आहे असे आम्हांला वाटते. मनीषा कुरणे म्हणाल्या, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर यांनी निर्णय घ्यावा. विलास पाटील, सरदार चौगले, अरूण जाधव यांनीही फोनवरून लवकर बदल व्हावा अशी इच्छा व्यक्त केली.
चौकट
पदाधिकारी नेत्यांचे ऐकत नाहीत
विद्यमान पदाधिकारी नेत्यांचे ऐकत नाहीत असा आरोप यावेळी सुभाष चौगुले यांनी केला. ते म्हणाले नेत्यांनी समान निधी वाटप करा असे सांगूनही सभापती मनमानी करीत आहेत. माणसे बदलली तरी खुर्चीचे गुण बदलत नाहीत. तेव्हा नेत्यांनी वेळ मारून नेण्याचे काम करू नये.