कोल्हापूर : कचरा वेचक महिलांना ओळखपत्र देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही महानगरपालिकेचे उपायुक्त निखील मोरे यांनी दिली. केशवराव भोसले नाट्यगृहात गुरुवारी दुपारी अवनिच्यावतीने आयोजित कचरा वेचक हक्क परिषदेत ते बोलत होते.
कचरा वेचक महिलांना संघटित करुन त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून एकटी व अवनि संस्थेतर्फे कचरा वेचक हक्क परिषदेचे आयोजन कोल्हापुरात पहिल्यांदाच करण्यात आले होते. यावेळी मुंबई येथील परिसर विकास भगिनी संघाच्या अध्यक्ष सुशीला साबळे, अनुराधा भोसले, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुरज पवार, डॉ. रेश्मा पवार उपस्थित होत्या.
कचरा वेचकांना सोयी-सुविधा मिळण्यासाठी हे ओळखपत्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन उपायुक्त मोरे यांनी यासंदर्भात लवकरच कार्यवाही सुरु करु, असे सांगितले. भगिनी संघाच्या सुशीला साबळे यांनी कचरा वेचक या असंघटित असल्याने त्यांना न्याय मिळण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनाला आणून देत संघटित होऊन आपले प्रश्न शासन दरबारी सोडवून घेऊ, असे आश्वासित केले.
यावेळी जैनुद्दीन पन्हाळकर, शबाना पन्हाळकर, वनिता कांबळे, मनीषा धामोणे यांच्यासह कचरा वेचक महिला उपस्थित होत्या.