* मोफत अन्नधान्य वितरण शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : महापुराने अनेक कुटुंबांचे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकार सदैव त्यांच्यासोबत आहे. शासनस्तरावरील निर्णयांची योग्य अंमलबजावणी करण्यात येत आहे तसेच पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ते शिरोळ तालुक्यातील मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रमात बोलत होते. उदगाव येथील विकास सोसायटीच्या रास्त भाव दुकानात हा शुभारंभ कार्यक्रम पार पडला.
उदगाव (ता. शिरोळ) येथे आयोजित तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रमात यड्रावकर म्हणाले, वेळेवर कर्नाटक शासनाशी समन्वय साधल्याने महापुरामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्वांना स्थलांतरित करण्यात प्रशासनाने योग्य भूमिका बजावली. पुढेही पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ म्हणाल्या, तालुक्यातील ग्रामीण प्रशासनाने मोठे नुकसान होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पूरग्रस्तांसाठी शासन जो निर्णय घेईल त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येईल. यावेळी औपचारिक सात कुटुंबांना दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ देण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच कलीमुन नदाफ, उपसरपंच रमेश मगदूम, तलाठी सचिन चांदणे, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, बाचू बंडगर, राजू मगदूम, पोलीस पाटील अनुराधा कांबळे, संजय चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ - पूरग्रस्त कुटुंबांना मोफत अन्नधान्य वितरण कार्यक्रमाला राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, कलीमुन नदाफ, रमेश मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
छाया- ओंकार फोटो, उदगाव