कोल्हापूर : कोल्हापूरचा पर्यटनाच्या अंगाने विकास व्हायचा असेल तर येथे पंचतारांकित हॉटेल्स सुरू व्हायला हवीत त्यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गुरुवारी येथे सांगितले. केरळच्या धर्तीवर कोल्हापूरचेही पर्यटनाचे मॉडेल विकसित व्हावे असे आमचे प्रयत्न असून त्यात जिल्हा प्रशासनाचा सहभाग कमी असेल. कोल्हापूरनेच त्यात पुढाकार घ्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हॉटेल व्यवसायातील नामांकित ब्रँड कोल्हापुरात आले तर त्यातूनही पर्यटनाच्या जागतिक नकाशावर जाण्याची संधी असते. सर्वच स्तरांतील पर्यटकांना सामावून घेईल अशी उत्तम हॉटेल व्यवस्था ही पर्यटन विकासाची मूलभूत गरज आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारपासून पर्यटन सप्ताह सुरू होत आहे. जिल्ह्यातील ३० पर्यटने स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या आठवड्यात त्या स्थळांना भेटी देऊन पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा आराखडा करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासंबंधीची चर्चा करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरातील प्रमुख वृत्तपत्रांतील ज्येष्ठ बातमीदारांशी संवाद साधला व कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी म्हणाले, या आठवड्यात आम्ही पर्यटन विकासाची पायाभूत तयारी करण्याचे नियोजन केले आहे. सध्या कोरोनाचे निर्बंध असल्याने पर्यटनास व अंबाबाई दर्शनास बंदी आहे. त्याचा उपयोग करून आम्ही पर्यटनाचा कृती आराखडा निश्चित करू. त्या ठिकाणी अजून काय करायला हवे याची माहिती घेऊ.. त्यासाठी हॉटेल मालक संघापासून ते क्रीडाईपर्यंत अनेक संस्था, संघटना, व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. कोल्हापुरात जे जे समृद्ध आहे, ते ते जगाच्या नकाशावर कसे नेता येईल यावर आमचा भर आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनीही या कामासाठी निधीचे नियोजन केले आहे. या कामांत लोकांची मानसिकता बदलून पर्यटन संस्कृती विकसित करण्यात माध्यमांची भूमिका फारच महत्त्वाची ठरू शकते.
यावर भर...
अधिकारी बदलले म्हणून पर्यटन विकासाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असे होऊ नये. ते कोल्हापूरच्याच लोकांनी पुढे विकसित केले पाहिजे असा गाभा नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले.