जयसिंगपूर : उदगाव (ता़ शिरोळ) येथे जगाच्या विश्वशांतीसाठी इज्तेमा या पवित्र कार्यक्रमाचे (बुधवार, दि. ३० व गुरुवार, दि. ३१) दोन दिवस आयोजन करण्यात आले होते़ रात्री नऊ वाजता हाफिज मन्सूर यांच्या उपस्थितीत ५० विवाह, सामूहिक जप हे धार्मिक कार्यक्रम झाले़ इज्तेमामध्ये दुवा पठण व विश्वशांतीसाठी नमाज पठण करण्यात आले़ यावेळी पाच लाखांहून अधिक मुस्लिम बांधवांनी कोल्हापूर, सांगली व कर्नाटक सीमाभागातून हजेरी लावली होती़ मनुष्याला जगण्यासाठी परमेश्वराने मोठे वरदान दिले आहे. प्रत्येक मनुष्याने माणुसकी जपण्यासाठी विचार करून समभाव बंधूसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे़ आई-वडिलांचा आदर राखून प्रत्येकाला मानसन्मान व मदत करावी. माणसांमध्ये बंधुत्व टिकण्यासाठी देशात शांततेची गरज आहे, असे प्रतिपादन हाफिज मन्सूर (पुणे) यांनी केले़ गुरुवारी सकाळी आठ वाजता युसूफभाई एस.टी. (औरंगाबाद), दुपारी २ ते ५ अफसरभाई (पुणे), सायंकाळी ५ वाजता मौलाना सैय्यब (मुंबई) यांनी दिवसभरात विश्वशांततेसाठी महत्त्वाचे संदेश दिले़ गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी दाखल होत होते, तर विविध तालुक्यांप्रमाणे नमाज पठणसाठी सुसज्ज सोय करण्यात आली होती़ तसेच विभागाप्रमाणे भोजनाची सोय करण्यात आली होती़ दरम्यान, गुरुवारी दिवसभरात शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम ठिकाणी हजेरी लावली होती़ ४० एकर परिसरात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी व मोठी वाहने अशा वेगवेगळ्या स्वरूपात पार्किंगची सुविधा करण्यात आली होती़ यावेळी इचलकरंजीचे अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी, जयसिंगपूर विभागाचे उपअधीक्षक रमेश सरवदे यांच्यासमवेत सहायक पोलिस निरीक्षक संतोष डोके, शिरोळचे सहायक पोलिस निरीक्षक वसंत बागल, पेठवडगावचे सहायक पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी) अडथळा नाही : सुसज्ज वाहतूक व्यवस्थासायंकाळी सहा वाजल्यापासून पोलिस अधीक्षक संदीप देशपांडे यांच्या आदेशानुसार सांगलीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक अंकली टोल नाका जैनापूर मार्गे वळविण्यात आली होती, तर कोल्हापूरहून येणारी वाहतूक ही तमदलगे बायपासमार्गे सोडण्यात येत होती़ इचलकरंजी व जयसिंगपूरहून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांना जयसिंगपूर रेल्वे स्टेशनमार्गे रात्री उशिरापर्यंत सोडण्याचे काम सुरू होते़ त्यामुळे वाहतुकीत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही़
लाखोंच्या संख्येने उदगावात इज्तेमा
By admin | Published: April 01, 2016 1:11 AM