कोल्हापूर : महापूर आणि अतिवृष्टीमुळे स्थानिक कांद्याची आवक कमी झाल्याने परदेशातून कांदा आयात सुरू झाली आहे. आफ्रिका खंडातील समृद्ध देश असलेल्या इजिप्तमधून कोल्हापुरात गुरुवारी १0 टन कांदा दाखल झाला आहे. आकाराने मोठा आणि रंगाने गर्द गुलाबी असणाऱ्या या कांद्याला किलोला ८0 रुपये, असा दर मिळाला.कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरी ट्रेडर्समध्ये सकाळी या कांद्याचा सौदा निघाला. यावर्षी कांद्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. त्यातही मोठा कांदा मिळणे दुरापास्त झाल्याने पहिल्यांदाच परदेशातील कांद्याची मागणी नोंदविली गेली होती. इजिप्तमधून आॅनलाईन मागविलेला १0 टन कांदा मुंबई बंदरातून बुधवारी कोल्हापुरात दाखल झाला. त्यापैकी गुरुवारी पाच टन कांद्याची विक्री झाली.
क्विंटलला ८000 रुपये असा दर मिळाला. हा कांदा आकाराने मोठा असल्याने हॉटेल व्यावसायिकांकडून याला मागणी आहे. आज, शुक्रवारी उर्वरित कांद्याचा सौदा काढला जाणार आहे, असे हरी सेठ यांनी सांगितले.दरम्यान, परदेशातून कांदा येत असतानाही कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला याविषयी काहीच माहिती नसल्याचे गुरुवारी समोर आले.
समिती सचिव मोहन सालपे यांच्याशी संपर्क साधला असता, असा कोणताही कांदा परदेशातून आला नसल्याचे १00 टक्के खात्री देऊन सांगितले; पण गुरुवारी सकाळीच समिती कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कांदा मार्केटमध्ये इजिप्तच्या कांद्याचा सौदा निघाला होता. यावर समिती प्रशासन नेमकी कोणाची आणि कशाची माहिती ठेवते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.