इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याकडील संचालकांच्या निवडणुकीसाठी माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांच्या गटाचे आठ उमेदवार अपात्र ठरल्याने खळबळ उडाली. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या गटाचे सर्व उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून, ‘ब’ वर्ग संस्था गटातील निवडणूक बिनविरोध झाली असल्याचे मानण्यात येते.पंचगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ‘अ’ वर्ग उत्पादक सभासदांच्या बारा संचालकांच्या जागांसाठी ७० व्यक्तींनी १२० अर्ज, ‘ब’ वर्ग अनुत्पादक संचालकाच्या व्यक्ती गटातून एका जागेसाठी १२ व्यक्तींनी २२ अर्ज व संस्था गटाच्या एका जागेसाठी ८ व्यक्तींनी ११ अर्ज दाखल केले होते. विद्यमान अध्यक्ष पाटील यांच्या सर्व संचालकांनी, तर त्यांच्या विरोधात माजी अध्यक्षा मगदूम यांच्यासह बाराजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.आज, मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभांना सलग तीन वर्षे अनुपस्थित राहणे, नोंद केलेला ऊस कारखान्यास किंवा पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सलग दोन वर्षे कारखान्यास ऊस न घालणे, तसेच अन्य साखर कारखान्यांकडे सभासद असणे, अशा प्रकारच्या कायद्यातील तरतुदींमुळे आठ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याचे सांगण्यात आले. तसेच रजनीताई मगदूम (निमशिरगाव), रमेश चौगुले (चिंचवाड), बाबूराव सादळकर (ढोणेवाडी) यांचे उत्पादक गटातून, तर सुकुमार गडगे यांचा अनुत्पादक व्यक्ती गटातून उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. याशिवाय ‘ब’ वर्ग अनुत्पादक संस्था गटातून पी. एम. पाटील व बंडा माने हे दोनच अर्ज पात्र ठरले असून, दोन्हीही सत्तारूढ गटाचे असल्याने या गटाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे मानले जात आहे.दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १२ जानेवारीला असून, बहुराज्य सहकार कायद्यातील तरतुदींनुसार १४ जानेवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार आणि मतदान केंद्रांची घोषणा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अवैध ठरलेले उमेदवारउमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये भालचंद्र कागले (मजरेवाडी), अण्णासाहेब शहापुरे (इचलकरंजी), रायगोंड पाटील (चंदूर), बाबगोंड पाटील (जांभळी), पांडुरंग खाडे (घालवाड), शिवाजी नाईक (दानवाड), अशोक पाटील (कबनूर) व बी. डी. पाटील (कबनूर) यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.
मगदूम गटाचे आठ उमेदवार अपात्र
By admin | Published: January 07, 2015 12:52 AM