सांगली : सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दि. ३ मे २०२१ रोजी १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल (सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात ५ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाची चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडक संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळतोय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे.
औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून कोरोनाची शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे सद्यस्थितीत गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी हा संपूर्ण लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.पालकमंत्री जयंत पाटील हे १ मे पासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करत आहेत व कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.