कोल्हापूर : जिल्ह्यातील साठ वर्षांवरील आठ लाख ज्येष्ठ नागरिकांना व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त लोकांना सोमवारपासून कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु राज्य शासनाकडून त्याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना अजून जिल्हा आरोग्य विभागास आलेल्या नाहीत. लसीकरणाबद्दलचा सामान्य माणसांच्या मनातील संभ्रम दूर करणे व त्याचवेळेला ही लसीकरण मोहीम राबविणे, असे दुहेरी आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
लसीकरणाची ही मोहीम राबवावी लागणार आहे; परंतु त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची आम्ही वाट पाहत आहोत, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी ‘लोकमत’ला दिली. केंद्र शासनाने देशातील कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त लोकांना लस पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हयात किती लोकांना ही लस द्यावी लागेल, याची माहिती उपलब्ध झाली आहे. व्याधीग्रस्त लोकांचा गतवर्षी जिल्हा प्रशासनाने सर्व्हे केला आहे. त्यामुळे ही माहिती आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध आहे.
मागील जनगणनेनुसार जिल्ह्यात ४५ ते ६० वयापर्यंतचे ४ लाख २८ हजार पुरुष आणि ४ लाख २० हजार महिला अशी ८ लाख ४८ हजार लोकसंख्या आहे. ती सगळीच काही व्याधीग्रस्त नाही. साठ वर्षांवरील लोकसंख्या निश्चित आहे.
लसीकरण मोहीम हाती घेतली जाणार असून, त्याबद्दल राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना अजून आलेल्या नसल्याचे डॉ. साळे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, हे लसीकरण मोफत असेल का, त्यासाठी लस कधी उपलब्ध होणार, वाटपाचे नियोजन कसे करायचे, यासंबंधी आता काहीच चित्र स्पष्ट नाही. आता जिल्हयात २८ बूथवर रोज सरासरी १७०० जणांना लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत २८ हजार जणांना लसीकरण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांची संख्या विचारात घेता, त्यांच्या लसीकरणाचा कार्यक्रम किमान चार महिने चालू शकतो.
कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) : ३८ लाख ७६ हजार ८
ग्रामीण : पुरुष : १३ लाख ४८ हजार ८१५
स्त्रिया : १२ लाख ९७ हजार १७७
नागरी : पुरुष : ६ लाख ३१ हजार ८४३
स्त्रिया : ५ लाख ९८ हजार १६६
जिल्हयातील ६० वर्षांवरील लोकसंख्या
पुरुष : ३ लाख ८८ हजार ८२६
स्त्रिया : ४ लाख १२ हजार ७६४.