कोल्हापूर : सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १५ जून रोजी शाळा सुरू होणे अडचणीचे असल्याने सन २०२०-२१ हे शैक्षणिक वर्षाचे आठ महिन्यांचे करून शासनाने शैक्षणिक नियोजन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीने शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली ई-मेलद्वारे केली असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी निवेदनाद्वारे दिली.
महाराष्ट्रात १५ जून रोजी शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते; तथापि सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन पूर्णपणे हटेल असे वाटत नाही. दहावी व बारावीचे पेपर्स अजून तपासावयाचे असल्याने निकाल लागण्यास विलंब लागणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बाजारपेठेत मुलांना शालेय साहित्य, गणवेश व पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी काही कालावधी जाणार आहे. मुले ही कोरोना संसर्गाबाबतीत अधिक संवेदनशील असल्याने मुलांमध्ये या रोगाचे संक्रमण जलदगतीने होण्याचा धोका असतो.
त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर वर्गात मुले एकत्र येणार असल्याने विद्यार्थी व पालक यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना घालविणे गरजेचे आहे. तसेच कोराना रोगावर प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजनांच्या सोयी व तरतुदी करण्यासाठी शाळांना काही वेळ द्यावा लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करता, पुढील शैक्षणिक वर्ष आठ महिन्यांचे करावे व सुट्ट्या कमी करून शालेय अभ्यासक्रम व शालेय व्यवस्थापन यांचे नियोजन करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे दिली आहे.