हुपरी : येथील शिवाजीनगर परिसरातील ‘श्री’ चौकातील दोन हॉस्पिटलांच्या पिछाडीस असलेल्या गटारीमध्ये अपूर्ण वाढ झालेले सात-आठ महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक सापडले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून ‘अर्भक’ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, यळगूड-हुपरी रोडवरील ‘श्री’ चौक परिसरामध्ये असणार्या आॅर्थोपेडिक हॉस्पिटलच्या मागे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीच्या पाठीमागे असणार्या सुमारे पाच फुटाच्या भंगी बोळातून वाहणार्या गटारीमध्ये सात-आठ महिन्यांचे अपूर्ण वाढ झालेले पुरुष जातीचे अर्भक अज्ञातांनी टाकून दिल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती बघता-बघता शहरामध्ये सर्वत्र पसरली. त्यामुळे हे अर्भक पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काहींनी पोलिसांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले व त्यांनी पंचनामा करून अर्भक ताब्यात घेतले. शवविच्छेदनासाठी अर्भक सी.पी.आर.मध्ये पाठवून दिले. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मास आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच पोलीस तपासास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पोलिसांतून देण्यात आली. (वार्ताहर)
गटारीत सापडले आठ महिन्यांचे अर्भक
By admin | Published: May 28, 2014 1:02 AM