कोल्हापूर : जिल्ह्यात २५ पेक्षा जास्त घातक गुन्हे दाखल असलेल्या एसटी गँगच्या आठ गुंडांना मोक्का कारवाई अंतर्गत राजारामपुरी पोलिसांनी रविवारी अटक केली. त्यांना आज, सोमवारी पुणे मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार हा पसार झाला आहे. या मोक्का कारवाईने जिल्ह्यातील गँगवार हादरले आहे. संशयित साईराज दीपक जाधव (वय २६), विजय ऊर्फ रॉबर्ट रवींद्र खोडवे (२८), प्रसन्न सूर्यकांत आवटे (२६), अनिकेत आनंदराव सातपुते (२१), सनी प्रताप देशपांडे (२३), विठ्ठल काशीनाथ सुतार (२७), तुषार शिवाजी डवरी (२६), राकेश किरण कारंडे (२७, सर्व रा. राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. मोक्का कारवाईचा प्रस्ताव दाखल होताच तहसीलदार याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर हरकत घेत सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी तहसीलदारसह त्याच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गवळी यांनी त्याचा मोक्का प्रस्ताव रद्द केल्यानंतर त्याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला न्यायालयाने आठवड्याला राजारामपुरी पोलिस ठाण्यात हजेरी देण्यासाठी आदेश देऊनही तो नियमांचे पालन करीत नाही. त्याला व त्याच्या साथीदारांना अटक करून पुढील तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, अशी विनंती केली होती. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथेही अर्ज फेटाळल्याने तो साथीदारांसह पसार झाला होता. पोलिस या टोळीच्या शोधात होते. रविवारी त्याच्या साथीदारांना अटक केली. त्याचा घरी नातेवाइकांकडे शोध घेतला असता मिळून आला नाही. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अमृत देशमुख अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) वाढती गुन्हेगारी : पुणे मोक्का न्यायालयाकडे प्रस्ताव दिवसेंदिवस शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी स्वप्निल तहसीलदार याच्यासह साईराज जाधव, विजय खोडवे, प्रसन्न आवटे, अनिकेत सातपुते, सनी देशपांडे, विठ्ठल सुतार, तुषार डवरी, राकेश कारंडे, रामचंद्र सावरे या टोळीवर मोक्का कारवाई करावी, यासाठी पुणे मोक्का न्यायालयाकडे प्रस्ताव पाठविला होता.
एसटी गँगच्या आठजणांना ‘मोक्का’अंतर्गत अटक
By admin | Published: October 17, 2016 1:16 AM