भुर्इंज : ‘संतोष पोळ या नावाचे आमच्या गावात तब्बल आठजण आहेत. संतोष पोळ या नावाचे त्यातील पाचजण तर आम्ही एकाच वर्गात होतो. संतोष पोळ नावाची मॅजोरीटी आहे म्हणून अभिमानही वाटायचा. एकाच नावाचे आठजण असल्याने होणाऱ्या गमती-जमतीतून आनंदही मिळायचा; पण यातीलच एका संतोष पोळने राक्षसी कृत्य केले. त्यामुळे उर्वरित आम्हा सर्व संतोष पोळ या नावकऱ्यांना ‘संतोष’ या नावाचीच आता लाज वाटू लागली आहे,’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया धोम येथील संतोष पोळ नावाच्या तरुणांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘नावात काय आहे?’ असा प्रश्न शेक्सपिअरने उपस्थित केला होता. मात्र, या नावानेच धोममधील आठजणांच्या वाट्याला मन:स्ताप, संताप, चीड दिली आहे. धोममधील तथाकथित डॉ. संतोष पोळ याने तब्बल सहाजणांचा खून केल्याचे नुकतेच उघडकीस आले. आणि सर्वत्र संतापाची भावना उमटली. धोम गावात ही भावना अधिकच आहे. डॉ. संतोष पोळ हा मुळातच आई-बापा विना वाढलेले पोर म्हणून गावकऱ्यांनी त्याला सहानभूती दिली. त्याचे लग्नही गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन लावले. त्यानंतर मात्र याने एक-एक प्रताप दाखवायला सुरुवात केली. संपूर्ण गावच्या नजरेतून तो उतरू लागला. आता तर या संतोष पोळने तब्बल सहाहून जास्त जणांचा खून केल्याचे निष्पन्न झाल्याने गावात संताप व्यक्त होत आहे.धोममधील संतोष पोळ या नावाच्या इतर आठजणांना मात्र या घटनेचा वेगळाच मन:स्ताप सहन करावा लागत आहे. डॉ. संतोष पोळचे प्रताप उघडकीस आले आणि इतर संतोष या नावाच्या तरुणांना दूरदूरच्या नातेवाईक व मित्रांकडून होणाऱ्या चौकशीचा नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ‘तो संतोष पोळ मी नाही...,’ असे समजावून सांगताना इतर साऱ्या संतोष पोळांची चांगलीच दमछाक होत आहे. आधीच डॉ. संतोष पोळच्या कारनाम्यांनी संतप्त झालेले इतर सारे संतोष पोळ मात्र कुणाच्याही ध्यानीमनी नसणाऱ्या या नाहक त्रासाने वैतागले आहेत. (प्रतिनिधी) दोन दिवट्यांनी घालवले नाव...डॉ. संतोष पोळच्या आधी धोम गावाचे नाव धुळीस मिळवण्याचा उपदव्याप आणखी एका दिवट्याने केला. तो दिवटा म्हणजे रवी धनावडे हा होय. या धनावडेने ३० जुलै २०१४ रोजी एका तरुणीचे साताऱ्यात अपहरण करून शिरगाव घाटात अत्याचार केला होता. भुर्इंज पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी हा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणून त्याच्या विरोधात ठोस पुरावे सादर केले. या धनावडेला २०१५ मध्ये न्यायालयाने १० वर्षांची ठोठावली. यातील विशेष बाब म्हणजे डॉ. संतोष पोळ हा रवी धनावडेचाच शेजारी. या दोघांमुळे गावाचे नाव खराब झाल्याची वेदना प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.कुठे ते आणि कुठे हा ...धोम धरण उभारण्यात धोम गावाचा मोठा वाटा आहे. स्वत:चे घरदार, संसाराचा त्याग करून दुसऱ्यांचे जीवन फुलविण्यासाठी, दुसऱ्यांसाठी विकासाच्या वाटा निर्माण करताना स्वत: खडतर आणि काट्याकुट्यांनी भरलेली वाट निवडली. धौम्य ऋषींचा वारसा आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा असणाऱ्या या गावचे सुपुत्र सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर देशमुख यांनी देशासाठी बलिदान दिले. देशमुख यांच्यासह सैन्यदल, पोलिस दलात सेवा बजावत गावाचे नाव मोठे करणारे गावातील इतर अनेक युवक कुठे आणि संतोष पोळ सारखा खुनी कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. फासावर लटकवाआमच्याच गावातील रवी धनावडेने दुष्कृत्य केले आणि त्याला शिक्षाही ठोठावली गेली. डॉ. संतोष पोळ याचे कारनामे तर भयानक, संतापजनक आणि चीड आणणारे आहेत. डॉ. संतोष पोळ याने नेहमीच दहशत निर्माण करून अनेकांना त्रास दिला आहे; पण तो एवढ्या थराला गेल्याचे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती एवढ्यावरच थांबली आहे काय? असाही प्रश्न आता सतावत असून, त्याला फासावर लटकवा.- संतोष शंकर पोळ
धोम गावात तब्बल आठ संतोष पोळ...
By admin | Published: August 17, 2016 12:15 AM