कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी मंगळवारी कोल्हापुरात होणाऱ्या ‘सर्किट बेंच’बाबत निर्णय न घेता सेवानिवृत्ती घेतली. त्याच्या निषेधार्थ खंडपीठ कृती समितीने बुधवारपासून कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाजावर तीन दिवस बहिष्कार टाकला. त्यामुळे एकाच दिवशी सहा जिल्ह्यांतील सुमारे आठ हजार खटल्यांचे कामकाज ठप्प झाले. कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील वकील गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने सर्किट बेंचसाठी संघर्ष करत आहेत. न्या. शहा यांनी ‘सर्किट बेंच’चा निर्णय न घेताच सेवानिवृत्ती घेतल्याने सहा जिल्ह्णांतील वकिलांच्या भावना तीव्र झाल्या. न्या. शहा यांचा निषेध व्यक्त करत सहा जिल्ह्यांतील न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सहा जिल्ह्यांतील सहा हजारांपेक्षा जास्त वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले. वकिलांच्या या ‘काम बंद’ आंदोलनामुळे दिवाणी व फौजदारी न्यायालयांचे कामकाज पूर्णपणे बंद राहिले. सहा जिल्ह्यांतील सुमारे आठ हजार खटल्यांची कामे ठप्प राहिली. दिवाणी व फौजदारी कामासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील न्यायालयात नेहमी वकिलांसह पक्षकारांची वर्दळ असते. आंदोलनामुळे हा परिसर शांत होता.
आठ हजार खटल्यांचे कामकाज ठप्प
By admin | Published: September 10, 2015 1:23 AM