कोल्हापूर : शहरातील विविध ३५ केंद्रांवरून एकूण ८२६३ जणांनी रविवारी महाराष्ट्र गट ‘क’ सेवा पूर्वपरीक्षा दिली. १९५३ उमेदवार गैरहजर राहिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षा घेण्यात आली. सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने परीक्षार्थींना केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली.परीक्षेसाठी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून शहरातील शहाजी महाविद्यालय, प्रायव्हेट हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, न्यू हायस्कूल, शासकीय तंत्रनिकेतन, विवेकानंद महाविद्यालय, कमला महाविद्यालय, गोखले कॉलेज, नेहरू हायस्कूल, आदी केंद्रांवर परीक्षार्थींची गर्दी होऊ लागली. त्यामुळे रविवारची सुटी असूनही महाविद्यालयांचा परिसर गर्दीने गजबजला होता.
सकाळी साडेदहा वाजता उमेदवारांना परीक्षेच्या हॉलमध्ये घेण्यात आले. त्यानंतर ११ ते १२ या वेळेत पेपर झाला. या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रावरून १०२१६ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यातील ८२६३ जणांनी परीक्षा दिली. ओळखीचा पुरावा सादर केल्यानंतरच उमेदवारांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाचे १२०० कर्मचारी कार्यान्वित होते.
पेपर सोपा होता|या परीक्षेत गणित, बुद्धिमत्ता चाचणी, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी सामान्यज्ञानावर आधारित १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे त्यांचे स्वरूप होते. पेपर सोपा होता, बरा होता. बहुतांश प्रश्न परिचित वाटणारे होते, असे काही परीक्षार्थींनी सांगितले.