अनिल पाटील
सरूड : लोकमत न्यूज नेटवर्क
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील आयकर भरणारे ६८९ व शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या, तसेच चुकीची माहिती सादर करणाऱ्या ११११ अशा एकूण १८०० शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. या सर्व अपात्र शेतकऱ्यांना त्यांनी लाभ घेतलेल्या सुमारे ८६ लाख २२ हजार रु. रकमेच्या वसुलीच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.
केंद्रीय कृषी कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी २०१९ मध्ये देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रु. अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नावावर कृषी क्षेत्र असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपले अर्ज शासनाकडे सादर करून या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली होती. परंतु शासनाच्या वतीने नुकतीच लाभार्थी शेतकऱ्यांची छाननी करण्यात आली आहे. यामध्ये नियमित आयकर भरणाऱ्या तालुक्यातील ६८९ आणि संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, आदी यासारख्या शासनांच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसह, दोन लाखांपेक्षा जादा उत्पन्न असणाऱ्या व एक लाखाहून जास्त पेन्शन घेणाऱ्या शेतकऱ्यांना, तसेच अर्जाद्वारे चुकीची माहिती सादर करणाऱ्या ११११ अशा एकूण १८०० शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच यापूर्वी या सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतलेली सुमारे ८६ लाख २२ हजार रु. वसुलीच्या नोटिसाही तालुक्यातील संबंधित अपात्र शेतकऱ्यांना लागू करण्यात आल्या आहेत.
x चौकट X
शाहूवाडी तालुक्यातील सर्व अपात्र शेतकऱ्यांना त्यांनी लाभ घेतलेली रक्कम शासन जमा करण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. सदरची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधित अपात्र शेतकऱ्यास महसूल वसुली प्रमाणपत्राद्वारे थकबाकीदार घोषित करून ही रक्कम कायदेशीर मार्गाने सक्तीने वसूल करण्यात येईल.
= गुरू बिराजदार, तहसीलदार शाहूवाडी
= तालुक्यातील ६८९ आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६४ लाख, तर चुकीची माहिती सादर करणाऱ्या इतर ११११ अपात्र शेतकऱ्यांकडून २२ लाख २२ हजार अशा एकूण ८६ लाख २२ हजार रु. ची वसुली करण्यात येणार आहे.