- समीर देशपांडे कोल्हापूर : एकीकडे विकासाची प्रक्रिया गतीने सुरू असताना दुसरीकडे जमिनीसह पंचमहाभूतांची अतोनात हानी होत आहे. म्हणूनच यातून सावरण्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्धार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. कोल्हापूर पासून जवळच असलेल्या कनेरी मठावर आयोजित सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारला जात आहे. जे काम शासनाच्या पातळीवर करण्याची गरज आहे तेच काम आज कणेरी मठाच्या माध्यमातून होत असून त्याला पाठबळ देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. या पुढच्या काळात देखील अशा पद्धतीचे लोकोत्सव महाराष्ट्रभर व्हावेत यासाठी शासन प्रयत्न करेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले संपूर्ण मानव जातीला अनेक प्रश्नांनी ग्रासले आहे. विविध प्रकारची प्रदूषणे ही रोगराईला आमंत्रण देत आहेत या पार्श्वभूमीवर सिद्धगिरी मठावर आयोजित या पंचमहाभूत लोकोत्सवाच्या माध्यमातून जागरण होईल असा विश्वास आहे. स्वामींवरील विश्वासामुळेच याचा संदेश सर्व जनतेपर्यंत जाईल. महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेतीला पाठबळ देण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्माण करण्याचे ही ठरवले आहे. यावेळी खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे प्रकाश अबिटकर यांच्यासह वेगवेगळ्या राज्यातून आलेले मान्यवर उपस्थित होते.