निवास वरपे म्हालसवडे : कसबा आरळे (ता. करवीर) येथील ग्रामदैवत कामाख्या देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या लेझीम स्पर्धेत खेळत असताना शंकर हरी गोते (वय ६५, रा. गोतेवाडी, ता. राधानगरी) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ग्रामपंचायतीच्या समोरील खचाखच भरलेल्या मैदानातील प्रेक्षकांसमोरच काल, बुधवारी (दि. १८) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.येथील कामाख्या तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी मर्दानी खेळांच्या किंवा पारंपारिक वाद्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यावर्षी नवरात्रोत्सवानिमित्त लेझीम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये जिल्हाभरातील दहा संघांनी सहभाग घेतला होता. शिस्तबद्ध नियोजन व सामाजिक संदेश देणारे प्रत्येक संघाचे उत्कृष्ट सादरीकरण यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी अबालवृद्धांसहित महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.प्रत्येक संघाला बारा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. गोतेवाडी येथील लोळजाई लेझीम मंडळ हे शेवटचे स्पर्धक होते. त्यांचा दहा मिनिटांचा कालावधी संपून शेवटच्या दोन मिनिटांचे सादरीकरण करत असतानाच लोळजाई मंडळातील पट्टीचे खेळणारे वयोवृद्ध खेळाडू शंकर गोते हे अचानक खाली कोसळले. कसेबसे शेजारील पिंपळाच्या पाराला टेकून बसले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून त्यांना त्वरित खाजगी रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शंकर गोते यांचे पंचक्रोशीत हलगी, लेझीम, दांडपट्टा व मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांबद्दल खूप मोठे नाव आहे. त्यांच्या आकस्मित मृत्यूमुळे गोतेवाडी सहित कसबा आरळे गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच विवाहित मुली, मुलगा व सून असा परिवार आहे.
Kolhapur: लेझीम स्पर्धेत खेळतानाच वृध्दाचा हृदयविकाराने मृत्यू, नवरात्रोत्सवातच घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 3:43 PM