कोल्हापूर: जीबी सिंड्रोममुळे गडमुडशिंगी येथील बजरंग केशव कांबळे (वय ६५) यांचा सोमवारी सकाळी सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे जानेवारीपासूनच्या जीबीमुळे मरण पावलेल्यांची संख्या पाचवर गेली आहे. तर शहरातील यादवनगरमधील एक लहान मुलगी आणि युवक अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत.कांबळे यांना दि. २४ फेब्रुवारी रोजी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जीबीवरील सर्व ते उपचार करण्यात आले. परंतु प्रतिकारशक्तीच कमी असल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला. यादवनगरमधील सात वर्षांच्या शरयू अरुण चव्हाण या मुलीला दि. २२ फेब्रुवारीला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु अजूनही म्हणावा तसा तिचा उपचाराला प्रतिसाद नसल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. याच यादवनगरमधील अमन बागवान या १७ वर्षांच्या युवकाला जीबी सिंड्रोमची लागण झाल्याने दि. २२ फेब्रुवारीलाच सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यालाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.दि. १ जानेवारी ते ३ मार्च २०२५ या काळात सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलेल्या २२ जणांना जीबीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १५ प्रौढ, तर ७ लहान मुलांचा समावेश आहे. यातील नऊ जणांना आतापर्यंत तब्येत बरी झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये ६ प्रौढ आणि २ लहान मुलांचा समावेश आहे, तर झारखंडच्या एका लहान मुलीला पालक घेऊन गेले आहेत, तर पाचजणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांतील सीपीआरमध्ये दाखल रुग्ण २२
- डिस्चार्ज दिलेले रुग्ण ०९
- मृत्यू झालेले रुग्ण ०५
- उपचार सुरू ०८
- व्हेंटिलेटरवर ०२