कोल्हापूर : महापालिकेची संभाव्य हद्दवाढ लक्षात घेता, महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांसोबत घ्यावी, अशी मागणी पदवीधर मित्रचे अध्यक्ष माणिक पाटील-चुयेकर व जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.
कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्या कमी होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची मुदत फेब्रुवारीमध्ये संपत असल्याने त्यांच्या निवडणुका महापालिकेच्या अगोदर घेतल्या तर हद्दवाढीनंतर महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या भागात पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. निवडणुका, पोटनिवडणुकांच्या काळातील आचारसंहितेमुळे विकासकामे थांबणार आहेत. परिणामी नागरिकांचे नुकसान होणार असल्याने महापालिका निवडणूक ही जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांसोबत घ्यावी, अशी मागणी पाटील-चुयेकर व पाटील-आसुर्लेकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. या वेळी तुकाराम भोसले, ॲड. रमेश बदी, संतोष धुमाळ, पंडित शेळके आदी उपस्थित हाेते.
फोटो ओळी : महापालिकेसोबतच जिल्हा परिषदेची निवडणूक घ्या, या मागणीचे निवेदन माणिक पाटील-चुयेकर व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. या वेळी तुकाराम भोसले, ॲड. रमेश बदी, संतोष धुमाळ, पंडित शेळके उपस्थित होते. (फोटो-०१०९२०२१-कोल-चुयेकर)