ही निवडणूक मुद्यावर लढणार आहोत. शिक्षण, आरोग्य, घरफाळा सुलभीकरण, पाणी, घरपाेच दाखले, पर्यावरण, वाहतूक व्यवस्था, पर्यटन विकास, हद्दवाढ, क्रीडा यासारख्या मुद्यांवर सर्व स्तरातील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निवडणुकीचा अजेंडा तयार केला जाईल, असे राचुरे यांनी सांगितले.
एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरण्याची आपची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे. ही निवडणूक काहींचा व्यवसाय झाला आहे. निवडून येण्यासाठी पैसे लावायचे आणि निवडून आल्यानंतर ते काढून घेण्यासाठी भ्रष्टाचार करायचा ही पद्धत मोडून काढण्यासाठी आम आदमी पार्टी जनतेतून देणग्या घेऊन निवडूक लढविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप देसाई यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. आपने वॉररुम तयार केली आहे. त्याठिकाणी सव्वा लाख फोन नंबर्स संकलित करण्यात आले आहेत. प्रत्येक घरात किमान तीन ते चार फोन केले जातील. सोशल मीडियाचा वापर केला जाईल. ८१ प्रभागात प्रत्येकी दोन प्रमाणे १६२ प्रोजेक्टर शो दाखविले जातील, असे देसाई यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत प्रचार समितीची घोषणा करण्यात आली. संदीप देसाई या समितीचे अध्यक्ष तर उत्तम पाटील, संतोष घाटगे उपाध्यक्ष आहेत. ही समिती १७ सदस्यांची आहे. यावेळी राज्य सचिव धनंजय शिंदे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाअध्यक्ष उत्तम पाटील उपस्थित होते.