लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १५ आॅक्टोबरपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.न्यायालयाने आदेश देऊनही कारखान्याची निवडणूक लांबणीवर टाकल्याविरोधात कारखान्याचे सभासद नामदेव श्रीपती पाटील यांनी अवमान याचिका दाखल केली होती; पण ती फेटाळून लावली.‘बिद्री’ साखर कारखान्याच्या वाढीव सभासदामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. न्यायालयाने वाढीव सभासदांची छाननी करून पात्र-अपात्र ठरविण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला दिले होते; पण न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी सहसंचालकांचे काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया लांबली होती. याविरोधात नामदेव श्रीपती पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात ‘अवमान याचिका’ दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.अवमान याचिका फेटाळलीसाखर सहसंचालकांनी पात्र, अपात्र ठरवून प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ९८२० सभासद अपात्र ठरले आहेत. त्यामुळे सहसंचालकांविरोधातील अवमान याचिका फेटाळून लावली; पण कारखान्याची निवडणूक १५ आॅक्टोबरपूर्वी घेण्याचे आदेश न्यायालयाने प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत.
१५ आॅक्टोबरपूर्वी ‘बिद्री’ची निवडणूक घ्या : सर्वोच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:43 AM