कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्हाध्यक्षपदाची निवड १२ एप्रिलला होणार आहे. २२ मार्चला बूथ कमिट्या पदाधिकारी निवडीपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून, त्यानंतर टप्प्या-टप्प्याने जिल्हा परिषद, तालुका व विधानसभा मतदारसंघ पदाधिकाऱ्यांची निवडी होणार आहेत. गेले दोन महिने तालुका पातळीवर प्राथमिक व क्रियाशील सभासद नोंदणीचा कार्यक्रम सुरू आहे. तालुक्यांतून सभासदांची नोंदणी अखेरच्या टप्प्यात असून, शुक्रवारी (दि. ६) प्राथमिक व क्रियाशील सभासदांची यादी जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. ८ मार्चला सभासदांची प्रारूप यादी तयार करण्यात येणार असून, ११ मार्चपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. १७ मार्चपर्यंत हरकतींवर निकाल देण्यात येणार असून, १८ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २२ मार्चपासून बुथ कमिट्यांच्या निवडीची प्र्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. ५ एप्रिलला विधानसभा व तालुकाकार्यकारिणी, जिल्हा व प्रदेश प्रतिनिधींची निवडी केल्या जाणार आहेत. १२ एप्रिलला जिल्हाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. १९ एप्रिलला मुंबई अध्यक्ष, तर २६ एप्रिलला प्रांताध्यक्षांची निवड केली जाणार आहे. ग्रामीण भागातून सुमारे १२ हजार सभासद नोंदणी झाली आहे. भिलारेंऐवजी दिलीप पाटील प्रदेश पातळीवरून पक्षातंर्गत निवडणुकीसाठी बाळासाहेब भिलारे यांची नियुक्ती केली होती. पण, त्यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी नकार दिला होता, त्यांच्याऐवजी दिलीप पाटील (सांगली) यांची बुधवारी प्रदेश कार्यालयाकडून नियुक्ती करण्यात आली. प्रदेश पातळीवरून पक्षांतर्गत दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार प्रक्रिया राबविली जात आहे. पक्षाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदेश पातळीवरून जबाबदार व्यक्तीला पाठविले जाते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. - अनिल साळोखे,जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी
जिल्हाध्यक्षपदाची निवड १२ एप्रिलला
By admin | Published: March 05, 2015 12:12 AM