कोल्हापूर : कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेला राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून, त्यात जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पुढील आदेशात जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायती व वरील चार ग्रामपंचायती अशा ४३३ ग्रामपंचायतींंचा कार्यक्रम नोव्हेंबरअखेर येण्याची शक्यता आहे.राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी (दि. १९) हा निवडणूक कार्यक्रम रद्द करीत असल्याची घोषणा केली. या निवडणुकांसाठी २४ फेब्रुवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते; मात्र कोरोनामुळे उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्याआधी ३१ जानेवारी २०२० अद्ययावत केलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या.
ही यादी १ जानेवारी २०१९ या दिनांकावर आधारित होती. आता निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२० या दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी २५ सप्टेंबरला प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले होते, छाननी प्रक्रिया सुरू होती. आता महिनाअखेरपर्यंत नव्याने मतदार यादी व निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायतींचा समावेश
- शाहूवाडी तालुका : कुंभवडे, मांजरे
- पन्हाळा तालुका : पोंबरे
- चंदगड : चिंचणे