लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) अध्यक्ष निवड १३ मे रोजी होण्याची शक्यता आहे. आज, गुरुवारी नवनिर्वाचित संचालक मंडळाला सभेच्या नोटिसा काढल्या जाणार आहेत. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्यात चुरस आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीला १७ तर सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीला चार जागा मिळाल्या. ‘गोकुळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तांतर झाले. त्यामुळे नवीन अध्यक्ष कोण? याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. अध्यक्षपदी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हेच घेणार आहेत. मंत्री मुश्रीफ हे आज, गुरुवारी कोल्हापुरात येत आहेत. त्यानंतर अध्यक्ष निवडीच्या हालचाली गतीमान होणार आहेत. सत्तांतर करून सभासदांनी सत्तेच्या चाव्या विरोधी आघाडीच्या हातात दिल्या आहेत. त्यामुळे सक्षमपणे कारभार करण्यासाठी अनुभवी संचालक अध्यक्षपदी बसवला जाणार आहे. त्यातून ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांची नावे चर्चेत आहेत. दोघांचेही प्रयत्न राहणार आहे, दोघांनाही संधी मिळणार असली तरी पहिल्यांदा कोण? याविषयी उत्सुकता आहे. सर्व बाजूंचा विचार करता विश्वास पाटील यांना पहिल्यांदा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित संचालकांना सभेच्या नोटिसा आज काढल्या जाणार आहेत. त्यानंतर किमान सात दिवसांनी म्हणजेच १३ मे रोजी अध्यक्ष निवडीची सभा होण्याची शक्यता आहे.
संचालकांच्या अभिनंदनासाठी रिघ
‘गोकुळ’च्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी घरी रिघ लागली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फोनद्वारेच अभिनंदन करण्याचा प्रयत्न उमेदवारांचा असला तरी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.