हुपरी : गेल्या महिन्याभरापासून रिक्त असणाऱ्या हुपरी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या सरपंचपद निवडीची प्रक्रिया अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली असून, ही निवड शनिवारी (दि. ३ जानेवारी) नवीन वर्षामध्ये होणार आहे. त्यामुळे शहरातील गटातटाच्या राजकारणाने मोठ्या प्रमाणात उसळी घेतली आहे. याप्रश्नी मंगळवार (दि. २३)च्या अंकामध्ये ‘लोकमत’मधून आवाज उठविण्यात आला होता. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने काल, बुधवारी तातडीने सरपंच निवडीची तारीख जाहीर करून त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, सरपंचपदी आण्णासाहेब शेंडुरे गटाच्या दीपाली बाळासाहेब शिंदे किंवा शिवसेनेच्या पूनम राजेंद्र पाटील यांचीच निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तत्कालीन सरपंच सुमन सर्जेराव हांडे यांच्याविरोधात कॉँग्रेस, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादीच्या १६ सदस्यांनी मिळून अविश्वास आणला होता. त्यांना पायउतार करण्यासाठी सर्व पक्ष एकत्रित आले. मात्र, नवीन सरपंच निवडण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद झाल्याने २८ नोव्हेंबरपासून सरपंचपद रिक्त झाले होते. त्यातच भरीस भर म्हणून दोन्हीही ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार ठप्प झाला होता. याप्रश्नी ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात आवाज उठवून जिल्हा प्रशासन व शहरातील राजकीय गट-तट तसेच कारभाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच निवडीची तारीख जाहीर करीत त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली. सरपंच निवड शनिवारी (दि. ३ जानेवारी) होणार आहे. सरपंचपद इतर मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असून त्यासाठी शेंडुरे गटाच्या दीपाली शिंदे, शिवसेनेच्या पूनम पाटील, आनंदी माळी, तर राष्ट्रवादीच्या रेवती पाटील पात्र आहेत. माजी मंत्री प्रकाश आवाडे गटाचे सर्व नऊ सदस्य एकत्रित येण्याबरोबरच शिवसेना-राष्ट्रवादीच्याही पाच सदस्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असल्याने आण्णासाहेब शेंडुरे गटाच्या दीपाली शिंदे यांची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गटातटाच्या राजकारणाने उसळी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
हुपरी सरपंच निवड ३ जानेवारीला
By admin | Published: December 25, 2014 11:41 PM