कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात केलेल्या तयारीची माहिती घेण्यासाठी शुक्रवारी (दि. २४) जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक होत आहे. प्रशासनाने २०११च्या जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्येनुसार प्रभाग (झोन) केले आहेत, नेमके किती प्रभाग होणार याबाबत निवडणूक आयोगच शिक्कामोर्तब करेल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सागिंतले. त्यामुळे आॅक्टोबर २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल प्रशासकीय स्तरावर वाजल्याचे स्पष्ट झाले.शहराची सध्या ७७ प्रभागांत विभागणी होते. नवीन लोकसंख्या निकषांनुसार आणखी चार प्रभागांची भर पडण्याची शक्यता आहे. नव्या सभागृहात प्रत्यक्ष निवडून आलेले ८१ तर स्वीकृत पाच असे एकूण ८६ नगरसेवक असतील अशी प्रशासनाची अटकळ आहे. आॅक्टोबर २०१५च्या शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक अपेक्षित असून १५ नोव्हेंबर २०१५पर्यंत नवीन सभागृह अस्तित्वात येणार आहे. नव्या प्रभागरचनेनुसार होणार असली तरी सध्याच्या ‘एका प्रभागात, एक नगरसेवक व एक मत’ अशी एकास एक पद्धतीनेच अशीच होणार आहे.प्रभागांची रचना व आरक्षणात नव्या जनगणनेनुसार बदल होणार आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुकीचे नियोजन कशाप्रकारे करावे, याबाबत महापालिका प्रशासनास निवडणूक आयोगाच्या स्पष्ट सूचना यापूर्वीच मिळाल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. नेमके किती प्रभाग असतील? प्रभाग रचना कशी असेल? यावर निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच शिक्कामोर्तब होईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रभागात मतदान वाढणारसध्या प्रत्येक प्रभागात ५५०० ते ६००० मतदारांची संख्या आहे. नव्या प्रभागात लोकसंख्या निकषांनुसार ६५०० ते ७००० मतदारांची संख्या असणार आहे. मुंबई महापालिक ा प्रांतीक कायद्यानुसार पहिल्या तीन लाख लोकसंख्येसाठी ६५ नगरसेवक व पुढील प्रत्येक पंधरा हजारांसाठी एक, या निकषाप्रमाणे शहरात नगरसेवकांची संख्या किमान ८१ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले
By admin | Published: April 23, 2015 1:01 AM