कोल्हापूर : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर कोल्हापूर जिल्ह्यातील १४ जणांची निवड झाली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची राज्य उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली असून, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची सचिवपदी बढती झाली. हे दोघेही प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचे काम पाहतील. जाधव यांच्या निवडीने शहरातील पदाधिकाऱ्याला पहिल्यांदाच इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली.प्रदेश कार्यकारिणीमध्ये ओबीसी सेलचे संदीप कुंभार, सचिन तोडकर, डॉ. अजय चौगुले आणि डॉ. संतोष चौधरी यांचा समावेश आहे. निमंत्रित सदस्यांमध्ये माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, ज्येष्ठ नेते बाबा देसाई आणि नव्यानेच भाजपमध्ये आलेले संग्राम कुपेकर यांचा समावेश आहे.निमंत्रित सदस्यांमध्ये जिल्ह्यातील सहाजणांचा समावेश आहे. यामध्ये माजी आमदार अमल महाडिक, विद्यमान महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, संदीप देसाई, शिरोळचे पृथ्वीराज यादव, डॉ. अरविंद माने, विजयेंद्र माने यांचा समावेश आहे. लोकसभा डोळ्यासमोर ठेवून या नव्या निवडी करण्यात आल्या आहेत. भाजपने बुधवारी तब्बल ४५ पदाधिकारी, २६४ विशेष निमंत्रित आणि ५१२ निमंत्रित सदस्यांची घोषणा केली आहे.
सर्व गटांना न्याय देण्याचा प्रयत्नया निवडींच्या नावावर नजर टाकली असता, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, समरजित घाटगे यांच्याशी संबंधित कार्यकर्ते, नेते यांना संधी देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक सचिन तोडकर यांचीही प्रदेश कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे.
महानगर अध्यक्षपदासाठी विजय जाधव स्पर्धेतमहेश जाधव हे प्रदेश कार्यकारिणीवर सचिव म्हणून निवडले गेल्याने आता महानगर अध्यक्षपदासाठी विजय जाधव यांचे नाव पुढे आले आहे. मंत्री पाटील गटाकडून जाधव यांच्यासाठी आग्रह होऊ शकतो. तर महाडिक गटाकडून विजय सूर्यवंशी यांचे नाव आघाडीवर आहे. राहुल चिकोडे यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याने त्यांना सध्याचे पद सोडावे लागण्याची शक्यता आहे. अगदीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच आग्रह धरला तर मात्र चिकोडे यांना मुदतवाढ मिळू शकते.
याद्या करताना गोंधळभाजपकडून या याद्या तयार करताना गोंधळ झाल्याचे स्पष्ट दिसते. ज्यांची सचिव म्हणून निवड केली आहे, अशा महेश जाधव यांचे नाव निमंत्रित सदस्यांच्याही यादीमध्ये आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झालेले संदीप कुंभार आणि विशेष निमंत्रित म्हणून निवड झालेले बाबा देसाई या दोघांची नावे निमंत्रित सदस्यांच्याही यादीमध्ये घालण्यात आली आहेत.