कोल्हापूर : आर्य क्षत्रिय समाज संस्थेच्या गेल्या मेमध्ये झालेल्या निवडणुकीत मतदानाचे निम्मे गठ्ठे चक्क निवडणूक निरीक्षकानेच न मोजता लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याची दखल घेऊन धर्मादाय आयुक्त कार्यालयाने निवडणूक अधिकारी आशिफ शेख यांच्या चौकशीचे आदेश शुक्रवारी दिले. निकाल एकतर्फी दिल्याप्रकरणी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील कर्मचारी आशिफ शेख यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेतर्फे धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेेकर यांच्याकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हटले आहे, आर्य क्षत्रिय समाज संस्थेची निवडणूक गतवर्षी १४ मे २०२२ ला झाली. कार्यकारी मंडळाच्या नऊ जागांसाठी निवडणूक झाली परंतु सर्वसाधारण गटातील सात जागांसाठी पंधरा उमेदवार रिंगणात होते. निवडणूक निरीक्षक म्हणून शेख होते. शेख यांनी निवडणूक निकाल एकतर्फीच घोषित केला. एकूण झालेल्या मतदानाची बेरीज आणि मोजलेले मतदान यांचा ताळमेळ लागला नाही म्हणून शेख यांच्या विरोधात तक्रार केली. निम्मेच मतदान मोजले. काही मतांचे गठ्ठे शेख यांनी लपवून ठेवले.
मतदानादिवशी शेख यांनी झालेले मतदान सील बंद न करता, त्यावर उमेदवारांच्या सह्या घेऊन ते स्वत:च्या ताब्यात न घेताच निघून गेले. हे समोर आल्यानंतर शेख यांच्या विरोधात मनसेने तक्रार केली. त्यानंतर शेख यांनी नऊ महिन्यांनी या संस्थेच्या निवडून आलेल्यांच्या ताब्यात असलेल्या मतांची मोजणी परवा ४ मार्च २०२३ रोजी केली. फेरमतमोजणी करताना संपूर्ण मतमोजणी पुन्हा न करता लपवून ठेवलेले मतांचे गठ्ठे मोजले.पुन्हा निवडून आलेल्या पहिल्याच पॅनेलला निवडून आल्याचे पत्र दिले. पूर्वी चूक केली असताना सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाने शेख यांनाच फेरमतमोजणीसाठी नियुक्त केले. लबाडीने संगनमताने मोठा आर्थिक व्यवहार केल्याचा संशय आहे. निवेदनावर जिल्हा अध्यक्ष विजय करजगार, राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील, जयवंत सुर्यवंशी, रत्नदीप चोपडे, हेमंत मेहंदळे आदींच्या सह्या आहेत.