जयसिंगपूर : येथील शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. या संस्थेची२८ वर्षांनंतर निवडणूक पार पडली. मागील अनेक वर्षांपासून या संस्थेवर विश्वस्त मंडळ कार्यरत नव्हते. आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली.
सहकाराच्या माध्यमातून धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याच्या उद्देशाने शिरोळ तालुक्यातील सहकारी सेवा सोसायट्यांच्या प्रतिनिधींची ही संस्था स्व. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सन १९७१ मध्ये स्थापन केली होती. स्थापनेनंतर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्यासह सातजणांचे विश्वस्त मंडळ या संस्थेवर कार्यरत होते. संस्थापक विश्वस्त मंडळातील सातपैकी पाच विश्वस्तांचे निधन झाल्यामुळे या संस्थेवर विश्वस्त मंडळ कार्यरत नव्हते. या संस्थेची निवडणूक घ्यावी यासाठी न्यायालयाने मार्च २०२० मध्ये अॅड. समृद्धी माने यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक झाली नाही. मात्र, जुलै २०२१ मध्ये या संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत १७ जुलै २०२१ अशी होती. या मुदतीअखेर विश्वस्त पदासाठीच्या ७ जागांसाठी ७ अर्ज दाखल झाले होते. रविवारी (दि. १८) अर्जांच्या छाननीनंतर निवडणूक बिनविरोध झाली.
नवनिर्वाचित विश्वस्त मंडळामध्ये संजय नांदणे (कोथळी), शिवगोंडा पाटील (नवे दानवाड), अनंत धनवडे (नरसिंहवाडी), फजलेअली पाटील (आलास), विद्याधर कर्वे (उमळवाड), सुरेश ऊर्फ भोला तकडे (शेडशाळ), पोपट भोकरे (कवठेसार) यांचा समावेश आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय लोटे यांनी काम पाहिले.