विश्वास पाटील - कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी जाहीर केली. या दोन्ही निवडणुकीमध्ये केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपची स्थानिक स्वराज्य संस्थेतील युतीही तुटण्याची प्रक्रिया या दोन निवडणुकीपासून सुरू होत आहे.कोल्हापूर महापालिकेत ८१, तर कल्याण-डोंबिवलीमध्ये १२२ प्रभाग आहेत. या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप पाचव्याहून खालच्या स्थानावर आहे. कोल्हापूरमध्ये त्यांचे कसेबसे ३ नगरसेवक आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये ९ नगरसेवक आहेत. तिथे शिवसेना गेल्या १५ वर्षांहून जास्त काळ सत्तेत असली तरी कोल्हापुरात मात्र शिवसेनेला दोन अंकी नगरसेवकही निवडून आणता आलेले नाहीत. आताच्या सभागृहात शिवसेनेचे ४ नगरसेवक आहेत. गेल्या निवडणुकीत कोल्हापुरात शिवसेनेने ५०, तर भाजपने २३ जागा लढविल्या होत्या.मार्चमध्ये भाजपचे राज्य अधिवेशन कोल्हापुरात झाले. ते अधिवेशन येथे घेण्यामागेही महापालिका निवडणुकीचेच राजकारण होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत सूतोवाच केले होते; परंतु ते कोल्हापूरच्या महापालिकेबाबत काहीच बोलले नव्हते तशी मुंबई महापालिकेची निवडणूक अजून वर्षभर लांब आहे; परंतु अगोदरच्या या दोन निवडणुकीत काय होते हे पाहून भाजप त्या निवडणुकीतील भूमिका ठरविण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.कोल्हापूर शहरात सध्या प्रत्येकी एक भाजप व शिवसेनेचा आमदार आहे. भाजपला तीनवरून बहुमतासाठी ४१ पर्यंत पोहोचायचे आहे. त्यांच्याकडे आता असलेले तीन विद्यमान नगरसेवक सोडून आणखी चार कार्यकर्ते सोडले तर निवडून येऊ शकेल, या क्षमतेचा उमेदवारच नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या सत्तेतला हा प्रमुख पक्ष नव्याने लोकांच्या पुढे जातो आहे. त्यामुळे भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम आहे की ती ओसरली याचीही फूटपट्टी या निवडणुकीला लागणार आहे. हे ध्यानात घेऊन काही झाले तरी महापालिकेत कमळ फुलवायचेच या इर्ष्येने भाजप व मुख्यत: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मैदानात उतरणार आहेत. स्वपक्षाचे बळ नाही हे त्यांना चांगले माहीत असल्यानेच त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणात दबदबा असलेल्या आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी संधान बांधले आहे. त्यांच्या ताराराणी आघाडीशी भाजपने सोयरिक केली आहे तसे कोल्हापुरात शिवसेना व भाजप या दोन पक्षांतील नैसर्गिक युतीबद्दल लोकांत चांगले जनमत असतानाही भाजपने शिवसेनेला ‘फाट्या’वर मारून काँग्रेसचे आमदार असलेल्या महाडिक यांच्याशी गट्टी केली आहे. यावरून या दोन पक्षांतील टोकाला गेलेले संबंध लक्षात येऊ शकतील. त्यामुळे निकालानंतर शिवसेनेचा भाजपला सत्तेपासून रोखणे हाच एककलमी अजेंठा असेल. त्यासाठी शिवसेनाही दोन्ही काँग्रेसशी हातमिळवणीही करू शकते. अशीच सद्य:स्थिती कल्याण-डोंबिवलीमध्येही आहे. तिथेही भाजप स्वबळावर लोकमत आजमावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एका अर्थाने या दोन्ही निवडणुकीत अन्य कुणापेक्षा भाजपचीच जास्त कसोटी लागलेली असेल, असे आजचे चित्र आहे.महापालिका एकूण जागा शिवसेना भाजप कोल्हापूर ८१ ०४ ०३कल्याण-डोंबिवली १२२ ३४+०७ ०९
युती तुटण्याची प्रारंभ करणारी निवडणूक
By admin | Published: September 29, 2015 12:54 AM