लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्च २०२१ पर्यंत पुन्हा लांबणीवर टाकल्या आहेत. जिल्ह्यातील जिल्हा बँकेसह १००२ संस्थांची निवडणूक प्रक्रियेला यामुळे स्थगिती मिळाली आहे. ‘गोकुळ’ची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालयत याचिका दाखल केली होती, मात्र अंतिम सुनावणीपूर्वीच शासनाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने याचिका निकालात काढली आहे.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा सिलसिला कायम आहे. जानेवारी २०२० पासून विविध कारणाने संस्थांच्या निवडणुकांना मुदतवाढ दिल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये निवडणूकांची प्रक्रिया सुरू झाली, मात्र, तोपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा स्थगिती दिली आहे. उच्च व सर्वेाच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या, अशा संस्थांसह २५० पेक्षा कमी सभासदसंख्या असलेल्या संस्थांच्या (गृहनिर्माण संस्था वगळून) निवडणूका घेता येणार आहेत.
जिल्ह्यातील सध्या १००२ संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जिल्हा बँक व गोकुळचा समावेश हाेता. ‘गोकुळ’ची निवडणूक घ्यावी, यासाठी जोतिर्लिंग दूध संस्था, केर्लीचे बाबासाहेब चौगुले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर अंतिम सुनावणी होणार तत्पूर्वीच शासनाने निवडणूक प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे याचिका निकालात निघाल्याने ‘गोकुळ’ची निवडणूकही लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
ज्या टप्यावर थांबल्या तेथूनच सुरू होणार
शासनाने स्थगिती देताना ३१ मार्चनंतर ज्या टप्यावर संस्थाची प्रक्रिया थांबवली, तेथून पुढे सुरू कराव्यात, असे आदेश दिले आहेत. जिल्हा बँकेचे ठराव गोळा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर ‘गोकुळ’च्या प्रारूप यादीवरील हरकतीची मुदत संपली आहे.
संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती अशा-
१८ मार्च २०२०
१७ जून २०२०
२८ सप्टेंबर २०२०
१६ जानेवारी २०२१