चंदगड : मुदत संपून दोन वर्षे उलटलेल्या चंदगड तालुक्यातील ‘क’ वर्गातील ५१ संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, फेब्रुवारी-मार्चअखेर या संस्थांच्या निवडणुका पूर्ण होतील, अशी माहिती अतिरिक्तसहायक निबंधक ए. आर. भंडारे यांनी दिली. ५१ पैकी चार सेवा संस्थांच्या निवडणुका ११ जानेवारीला होतील.सहकार खात्याने ९७वी घटना दुरुस्ती केल्याने बहुतांश संस्थांच्या निवडणुका मुदत संपूनही वेळेत झाल्या नाहीत. त्यातच खात्याने अ, ब, क, ड असे वर्गीकरण केले आहे. वर्गीकरणानुसार या संस्थांचे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. ‘ड’ वर्गातील संस्थांचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने त्यांच्या निवडणुका प्राथमिक स्वरूपात हात उंचावून किंवा अन्य मार्गाने घेतल्या जातात. ‘क’ वर्गातील संस्थांचे कार्यक्षेत्र तालुका मर्यादित, ज्यांचे भागभांडवल दहा लाखांपर्यंत आहे, अशा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.तालुक्यातील देव चाळोबा, गंधर्वगड, रामलिंग खामदळे, विठ्ठल सेवा संस्था, घुल्लेवाडी संस्था, करेकुंडी या चार सेवा संस्थांच्या निवडणुका ११ जानेवारी २०१५ रोजी घेण्यात येणार आहेत. उर्वरित चाळोबा हाजगोळी, भावेश्वरी म्हाळुंगे, रवळनाथ पोवाचीवाडी, आदी सेवा संस्थांच्या निवडणुका जानेवारीअखेर होणार आहेत. भरमू निगोजी गावडे पतसंस्था नागनवाडी, शिवनेरी ग्रामीण कालकुंद्री, भाग्यलक्ष्मी ढेकोळी, आदर्श चंदगड, वीरशैव माणगाव, दौलत हलकर्णी, माउली काजिर्णे, हनुमान सरोळी, फणेश्वर खालसा कोळिंद्रे, आदर्श कडलगे बुदु्रक, जय हनुमान केंचेवाडी, सातेरी शिरगाव, भावेश्वरी गुडवळे, ढेकोळी सेवा संस्था, सातेरी संस्था हंबिरे, भैरवनाथ इनाम सावर्डे, हनुमान कौलगे, मलतवाडी, माउली शिरगाव, मराठा चंदगड, छ. शाहू पतसंस्था चंदगड, नरसिंह पतसंस्था निट्टूर, तुडये, भाग्यलक्ष्मी कोरज, भैरवनाथ विंझणे, श्रीराम हेरे, महाराष्ट्र एस. टी. कामगार पतसंस्था चंदगड, चंदगड प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था, चंदगड तालुका सहकारी सेवकांची पतसंस्था, पारगड प्राथमिक शिक्षण सेवकांची संस्था हलकर्णी, खेडूत पतसंस्था, चंदगड ग्राहक संस्था, वैजनाथ भात गिरणी यशवंतनगर, विठ्ठल-रुक्मिणी ग्राहक अलबादेवी, आदी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे व इतर कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहायक सहकारी अधिकारी एम. व्ही. पाटील यांनी दिली. यामुळे तालुक्यातील राजकीय पक्षही सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विखुरलेले कार्यकर्ते एकत्र करण्याचे काम तालुक्यातील प्रत्येक गटात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.आता निवडणुकांचा धमाका सुरू होणार‘ब’ वर्गातील संस्था म्हणजे ज्यांचे भागभांडवल दहा लाखांवर व कार्यक्षेत्र तालुक्याबाहेर आहे, तर ‘अ’ वर्गातील संस्था म्हणजे ज्यांचे भागभांडवल लाखांवर आहे, कार्यक्षेत्र जिल्हा आहे, अशा संस्था. सहकार खात्याच्या ९७व्या घटना दुरुस्तीमुळे राज्यातील सर्व संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या; पण सहकार खात्याने निवडणुका घ्यायला परवानगी दिल्याने संस्थांच्या निवडणुकीचा धमाका सुरू होणार आहे.
५१ सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्चअखेर
By admin | Published: December 26, 2014 9:26 PM