राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोरोनामुळे गेली दीड वर्षे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, आगामी २०२२ मध्ये प्राथमिक शिक्षक बँक, ‘कोजिमाशि’ पतसंस्था, ‘राजाराम’ कारखाना, बाजार समित्यांसह ७ हजार संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत, समितीसह नऊ नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने अखंड वर्षभर मतदार या ना त्या निवडणुकीत गुंतून राहणार, हे निश्चित आहे.
कोल्हापूर ही सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जाते. येथील सहकारी संस्था इतक्या सक्षम संस्था कोठेच बघण्यास मिळत नाहीत. येथील राजकारणच सहकारावर अवलंबून असल्याने स्थानिक संस्थांसह जिल्हा पातळीवरील संस्था ताब्यात घेण्यासाठी चढाओढ सुरू असते. त्यामुळे येथील साध्या दूध अथवा विकास संस्थेची निवडणूकही अटीतटीचे होते. मात्र, जानेवारी २०२० पासून कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत.डिसेंबर २०२० अखेर जिल्ह्यातील सर्व गटातील ४ हजार ५७ संस्था निवडणुकीस पात्र होत्या. त्यातील ८८४ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात त्यामध्ये ३७२० संस्थांची भर पडली आहे. अशा सात हजार संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे मतदान ५ जानेवारी २०२२ रोजी होत आहे. त्यापाठोपाठ प्राथमिक शिक्षक बँक, ‘कोजिमाशि’ पतसंस्था, राजाराम साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील ९ नगरपालिकांची मुदत संपत आहे. त्यांची प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद व बारा पंचायत समितींच्या सभागृहाची मुदत मार्चमध्ये संपत आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसह ‘गडहिंग्लज’ व जयसिंगपूर बाजार समित्यांची निवडणूकही होत आहे. त्यामुळे नवीन वर्षात निवडणुकाचा नुसता धुरळा उडणार आहे.
तिसऱ्या लाटेवर राहणार निवडणुकांची गती
दक्षिण आफ्रिकेमध्ये काेरोनाचा नवा विषाणू आला आहे. देशात त्याचा फैलाव किती ताकदीने होतो, त्यावर लॉकडाऊन व इतर निर्बंध अवलंबून आहेत. त्यावरच निवडणुकांची गती राहणार आहे.
या प्रमुख संस्थांची होणार निवडणूक
बँकिंग : शिक्षक बँक, कोजिमाशि’ पतसंस्था, कोल्हापूर अर्बन बँक.
साखर कारखाने - ‘राजाराम’, ‘कुंभी’, ‘भोगावती’, ‘बिद्री.
नगरपालिका : गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड, पन्हाळा, मलकापूर, पेठवडगाव, कागल, मुरगुड, इचलकरंजी.
जिल्हा परिषद व बारा पंचायत समित्या.
पात्र संस्था -
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० अखेर - ४१३२ (पैकी ८८४ संस्थांच्या निवडणुका पूर्ण)
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ अखेर - ३७२०