इचलकरंजी : येथील संजय तेलनाडे व सुनील तेलनाडे या दोघांच्या नगरसेवक पदाच्या जागा रिक्त जाहीर करून निवडणूक आयोगाने त्याठिकाणी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे शोभा कांबळे व तेलनाडे बंधू अशा शहरातील एकूण तीन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तेलनाडे बंधूंवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार झाले आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजासाठी ते अनुपस्थित राहतात. परिणामी या दोन्ही जागा रिक्त झाल्याचे जाहीर करून त्याठिकाणी निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार संजय तेलनाडे याचा प्रभाग क्रमांक १८ ब व सुनील तेलनाडे याचा प्रभाग क्रमांक ३१ ब या दोन्ही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी २ फेब्रुवारी २०२१ पर्यंतची मतदार यादी निर्गमित केली आहे.
दरम्यान, शहापूर येथील क्रमांक ५ अ च्या नगरसेविका शोभा कांबळे यांचे निधन झाल्याने तेथेही मतदार यादी कार्यक्रम गेल्या आठवड्यात जाहीर झाला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तपासणीचे काम नगरपालिकेच्या पथकामार्फत सुरू आहे. सध्याच्या सभागृहाची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यामुळे सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही महिन्यांचाच कालावधी उरला आहे. परिणामी या तीन प्रभागांत पोटनिवडणुकीमध्ये चुरस होणार किंवा नाही, याबाबत चर्चा रंगली आहे.