'देगलूर पॅटर्न'वर ठरणार कोल्हापूर पोटनिवडणुकीचे 'उत्तर'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 11:46 AM2021-12-07T11:46:00+5:302021-12-07T12:11:06+5:30
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची जोरदार चर्चा.
विश्वास पाटील
कोल्हापूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदार संघाबाबत भाजपने जी रणनीती वापरली, तीच रणनीती कायम ठेवल्यास कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक होऊ शकते, असे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. निकाल काही लागो, परंतु मतदारसंघातील पाया मजबूत करायचा असेल तर निवडणूक लढवली पाहिजे, असा विचार देगलूरची पोटनिवडणूक लढविताना झाला. भाजपच्या उमेदवारास ६६ हजार ९७४ मते मिळाली व ज्या मतदारसंघातून कमळ चिन्ह मतपत्रिकेवरून पुसले गेले होते, तिथे भाजप आता दुसऱ्या स्थानावर आला.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार यासंबंधीची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे. भाजपने अजूनही अधिकृत कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही. डॉ. प्रज्ञा सातव यांना भाजपने बिनविरोध निवडून दिले. ही जागा आमदारांतून निवडून द्यावयाची होती. तिथे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे तो निकष येथे लागू होत नाही. नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचेच आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने गेल्या महिन्यात तिथे पोटनिवडणूक झाली. अंतापूरकर हे अनुसूचित जातीतील असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव पुढे आला होता.
परंतु, या मतदारसंघात मागील तीन निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली. तिथे भाजपला स्थानच नव्हते. त्यामुळे ही निवडणूक लढविल्यास पक्षाचा पाया भक्कम होईल असा विचार पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर झाला. निकाल काही लागायचा तो लागू दे, परंतु निवडणूक लढवावी असा निर्णय झाला. पक्षाने तिथे शिवसेनेचेच माजी आमदार सुभाष साबणे यांना रात्रीत भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली व त्यांनी चांगली लढत दिली. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले तरी आता तिथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष सुरू झाला असून, शिवसेना मात्र चित्रातून बाजूला फेकली गेली आहे. आगामी विधानसभेचा विचार करता भाजपला असेच राजकारण अपेक्षित आहे.
पाचवेळी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत
- जी स्थिती देगलूरमध्ये होती, तशीच कोल्हापूर उत्तरमध्येही आहे. येथेही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत मागील पाच निवडणुकीत झाली आहे. फक्त २०१४ मध्येच या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवून महेश जाधव यांनी ४० हजार मते घेतली आहेत.
- हा पक्षाचा करिष्मा आहे. आता शिवेसना हा राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेसची उमेदवारी जयश्री जाधव यांना मिळाल्यास त्या पक्षाचा उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता कमी आहे.
जानेवारी अखेरीस निवडणूक शक्य..
आमदार जाधव यांचे निधन झाले असून, विधानसभेची कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने विधिमंडळाकडे ३ डिसेंबरला पाठविला आहे. विधिमंडळ आता अधिसूचना काढून केंद्रीय निवडणूक आयोगास ते कळवते. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब व उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासोबत जानेवारीच्या अखेरीस ही निवडणूक होण्याची शक्यता आयोगाच्या सूत्रांनी व्यक्त केली.