कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् ्असोसिएशनतर्फे दरवर्षी फुटबॉल हंगामाची सुरुवात के. एस. ए. लीग सामन्यांपासून केली जाते. हे लीग सामने साधारणपणे २२ नोव्हेंबरच्या दरम्यान सुरू होतात. यंदा मात्र ते महापालिका निवडणुका आणि दसरा सणामुळे एक आठवडा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. याचबरोबर स्पर्धेसाठी पोलीस प्रशासनाची परवानगी ही आवश्यक बाब राहणार आहे.कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम के.एस.ए. लीग सामन्यातील क्रमवारीवरच ठरतो. यंदा तर हे सामने १ नोव्हेंबरला होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे एक आठवडा उशिराने सुरू होणार आहेत. कारण अजूनही संघांची आणि त्यांच्या खेळाडूंच्या नोंदणीला सुरुवात झालेली नाही. याशिवाय ज्या क्लब, मंडळ यांच्याकडून खेळणाऱ्या खेळाडूंच्या इकडे-तिकडे जाण्यानेही वाद, मारामारी, आदी घटना गृहीत धरून के.एस.ए.नेही या नोंदणी उशिराच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे नव्या फुटबॉल हंगामास २२ नोव्हेंबर रोजी सुरुवात होते. यंदा मात्र ही तारीख अपवाद ठरणार आहे; कारण उशिरा खेळाडूंची नोंदणी आणि त्यामुळे होणारा विलंब लक्षात घेता केएसएने ही स्पर्धा ३० नोव्हेंबर रोजी सुरू होऊ शकते. यात १६ संघांच्या खेळाडूंची नोंदणी केली जाणार आहे. यंदा परदेशी खेळाडू खेळविण्याकडे काही मंडळांचा प्रयत्न आहे. यावर सर्व सोळा संघांचे एकमत झाले, तर यंदा परदेशी खेळाडू शाहू स्टेडियमवर खेळताना दिसण्याची शक्यताही आहे. ए व बी डिव्हिजनची नोंदणीही महापालिका निवडणुका झाल्यानंतर सर्वसाधारणपणे ५ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. दरवर्षाप्रमाणे लीग सामने २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार होते. मात्र, शालेय फुटबॉल स्पर्धांना हे मैदान दिले होते. त्या दरम्यान पाऊस झाल्याने मैदान खराब झाले. ते पूर्वस्थितीत आणण्यासाठी कालावधी लागणार आहे. मैदानाच्या सपाटीकरणासाठी महापालिकेचा रोडरोलर भाड्याने घेतला जातो. तो यंदा महापालिका निवडणुका लागल्याने लवकर मिळत नाही. यासह निवडणुका व दसरा सणामुळे नोंदणी पुढे गेली. त्याच्या परिणामस्वरूप लीग स्पर्धाही एक आठवड्याने पुढे गेल्या. - संभाजी पाटील-मांगोरे, के.एस.ए. फुटबॉल नोंदणी सचिव
निवडणुकीचा ‘के.एस.ए. लीग’ फटका
By admin | Published: October 11, 2015 11:35 PM