कोल्हापूर : कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्षात ही विद्युत रेल्वे धावली आहे; पण ती तांत्रिक देखाव्यातून.
कोल्हापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक (जोडारी) म्हणून कार्यरत असणारे नितीन
विनायक मिरजकर हे ५२ वर्षीय तंत्रज्ञ दरवर्षी गणेशोत्सवात विविध समस्या तांत्रिक देखाव्यांतून मांडत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ ते गणेशोत्सवात आपापल्या परीने विविध विषय हाताळत आहेत.
यंदाही त्यांनी बेलबाग येथील आपल्या घरातील गणेशमूर्तींसमोर विद्युत रेल्वेची वाट पाहात असलेल्या बाप्पांचा तांत्रिक देखावा साकारला आहे. ॲक्रेलिक आणि बायोफोमच्या साहाय्याने रेल्वेचे दोन डबे आणि एका इंजिनाची प्रतिकृती त्यांनी तयार केली आहे. सात बाय पाच फुटाच्या जागेत घरीच रेल्वे रुळ, विद्युत खांब, रेल्वेस्थानक असा स्वयंचलित तांत्रिक देखावा त्यांनी तयार केला आहे. यासाठी त्यांना ऑटोमाबाईलचे शिक्षण घेतलेल्या चिरंजीव शुभमचे सहकार्य मिळाले आहे.
दहा वर्षांपासून मांडतात समस्या
मिरजकर हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी तांत्रिक देखावे तयार केले. नंतर त्यातून काही ना काही समस्या मांडण्याचे हे साधन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेली दहा वर्षे ते घरगुती गणपतीसमोर हे देखावे सादर करतात.
------------------------------------
२०१६-विज्ञानाचा पुरस्कार करण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसलेले श्रीगणेश.
२०१७-मोटारीचा इतिहास स्पष्ट करण्यासाठी वोक्सवॅगनच्या पहिल्या मॉडेलमध्ये विराजमान गजानन.
२०१८-निसर्गाची महती सांगण्यासाठी फूलपाखराच्या पंखावर बसलेली श्री गणपतीमूर्ती.
२०१९- अंतराळाची भव्यता सांगण्यासाठी एअरबलूनमध्ये बसलेले श्री गणेश.
२०२०- पावसाळ्यातील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रोडरोलरमध्ये बसलेला गणपती.
----------------------------------------
फोटो : 13092021-kol-Nitin Mirajkar-Ganesh Aaras
फोटो ओळ : नितीन मिरजकर.
फोटो : 13092021-kol-Ganesh Aaras Train
फोटो ओळ : बेलबाग येथील नितीन मिरजकर यांनी घरातील गणेशमूर्तींसमोर विद्युत रेल्वेची वाट पाहात असलेल्या बाप्पाचा तांत्रिक देखावा साकारला आहे.