इचलकरंजी : वीज क्षेत्रातील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे राजकीय सामाजिक व सहकार चळवळीतील खंदे कार्यकर्ते प्रताप गणपतराव होगडे (वय ७४) यांचे आज, सोमवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचेते विद्यमान कार्याध्यक्ष होते. जनता दलाच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ कार्यरत होते. त्यांच्या निधनामुळे वीज क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वीज क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून प्रताप होगाडे यांची ओळख होती. वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विजेच्या प्रश्नावर वाचा फोडली. १९७४ साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या लोक संघर्ष समिती त्यांचा सक्रिय सहभाग होता. राज्य जनता दलाचे सरचिटणीस, प्रधान महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष आदी पदावर त्यांनी काम केले. भ्रष्टाचार विरोधी लढ्यात ते अग्रभागी होते. तसेच यंत्रमाग विजेच्या प्रश्नावर त्यांनी वेळोवेळी वाचा फोडली. सन २००० साली निर्माण झालेला एनरोन प्रकल्प, वीज नियामक आयोग, वीजदर याबाबतीत त्यांनी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी लढा दिला.
इचलकरंजी शहरामध्ये पाणी प्रश्नावर आपला आवाज उठवला. इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीचे ते समन्वयक होते. उद्या, मंगळवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.