कोल्हापूर : हे सरकार शेतकऱ्यांचे असून, जे पीक वाहून गेलं त्या पिकावरील कर्ज व्याजासह शासन भरणार आहे. शेतमजुराला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मदत देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. शेतकऱ्याला जे-जे हवं ते-ते देणारं राज्यशासन देणार आहे. इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांसाठी 1 रुपये 22 पैसे दराने वीज, सबसिडीच्या बाबतीतही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
इचलकरंजीतील विविध विकास कामांचा शुभारंभ तर काही कामांचे लोकार्पण पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, आमदार सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, हिंदुराव शेळके, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, 107 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ तर काही कामांचे लोकार्पण करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय शासनाने घेतले आहेत. महापुराच्या काळातही 4 लाख 13 हजार लोकांना बोटीतून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. रोख पाच हजारांची मदत, 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू मोफत वाटप केले आहे. इचलकंरजी येथील यंत्रमागधारकांसाठी एक रुपया 22 पैशांची सबसिडी कमी केली आहे. याबाबतीतही अधिकाधिक सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या, सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून शासनाने निर्णय घेतले आहेत. गरिबांपर्यंत, समाजातील अंतिम माणसापर्यंत विकासाचा उदय पोहचला पाहिजे, हा उद्देश शासनाचा आहे. अनाथांना देखील एक टक्का आरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. मराठा आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय या शासनाने घेतला आहे. बीडसारख्या दुष्काळग्रस्त भागातून सांगली-कोल्हापूरमधील आपत्तीग्रस्तांसाठी मदत दिली जात आहे, असेही त्या म्हणाल्या. नगराध्यक्ष श्रीमती स्वामी यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार हाळवणकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.