संतोष मिठारीकोल्हापूर : कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे सुरू करावी, असे कोल्हापूरकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून (सीआरएस) पाहणी झाल्यानंतर मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी विद्युत रेल्वे या मार्गावरून धावणार आहे. येत्या २० दिवसांत संबंधित समिती ही पाहणी करणार आहे.कोल्हापूर ते मिरज या ५० किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा निधी लागला आहे. या मार्गावरून दि. २५ आॅक्टोबरला विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये ४० मिनिटांत रेल्वे इंजिन कोल्हापूरहून मिरजमध्ये पोहोचले. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आढळून आली नाही. या मार्गाची रेल्वेची रेल्वे सुरक्षा आयुक्त समितीकडून पाहणी होणार आहे.
या समितीने हा मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर या मार्गावरून प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे धावणार आहेत. येत्या २० दिवसांत या समितीकडून पाहणी झाल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर ते मिरजदरम्यान विद्युत रेल्वे धावतील.
त्यात तिरूपती, कोयना, अहमदाबाद, धनबाद, दिल्ली, गोंदिया, बंगलोर, बिदर, नागपूर, सोलापूर या लांब पल्ल्याच्या आणि कोल्हापूर-मिरज या मार्गावरील रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्याने मालवाहतूक स्वस्त होईल. प्रवासी वाहतुकीचा वेग वाढणार असून प्रदूषणही कमी होणार आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर आणि कोल्हापूर, सांगली, मिरज मार्गांवर लोकल सुरू होणार आहेत.निमशिरगावमध्ये होणार प्लॅटफॉर्मनिमशिरगाव येथील स्थानकातून सध्या रेल्वेत चढ-उतार करणे प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. विद्युत रेल्वे सुरू झाल्यास हा त्रास अधिक वाढणार आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे विभागाने निमशिरगाव स्थानकात प्लॅटफॉर्म करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्युत रेल्वे इंजिनची चाचणी यशस्वी झाली. एसएनटी गिअर हे अद्ययावत केले जातील. ‘सीआरएस’ समितीने पाहणी करून प्रमाणपत्र दिल्यानंतर साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोल्हापूर-मिरज मार्गावर विद्युत रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केल्या जाणार आहेत. कोल्हापूर ते पुणे मार्गाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे ध्येय आहे.-जे. पी. मिश्रा, विद्युतीकरण वरिष्ठ प्रबंधक, पुणे विभाग-----------------------------विद्युत रेल्वेची कोल्हापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होत असल्याचे समाधान आहे. विद्युतीकरणामुळे नव्या रेल्वे सुरू होणार आहेत. आता कोल्हापूर-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे. त्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती